छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याविरोधात जोरदार टीका केली जात आहे. राज्यापालांनी याआधी देखील बऱ्याचदा वादग्रस्त वक्तव्य केली होती. पण आता त्यांनी थेट महाराजांबद्दल वक्तव्य केले आहे. ‘ छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श आहे ’ , असे म्हणत त्यांनी नवीन वादाला तोंड फोडले. पण या वक्तव्याबाबत त्यांनी अद्याप दिलगिरी व्यक्त केली नाही. त्यामुळे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आक्रमक झाले आहेत. त्यांनी ट्विट करत यासंदर्भात राग व्यक्त करत थेट शिंदे सरकाराला कडक शब्दात इशारा दिला आहे. ‘शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच’, असे म्हणत त्यांनी सरकारला इशारा दिला आहे.
माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी ट्वीटमध्ये असे लिहिले आहे की, ‘भगतसिंग कोश्यारी यांच्यावर अजूनही कोणती कारवाई झालेली नाही. कारवाई होत नाही याचा अर्थ त्यांनी केलेल्या विधानांशी राज्यकर्ते सहमत आहेत का? महाराष्ट्राच्या जनतेला कुणीही गृहीत धरू नये. शिवभक्तांच्या भावना सरकारला समजत नसतील तर उठाव होणारच!’ अशा कडक शब्दात त्यांनी सरकारला इशारा दिला आहे. त्याचसोबत त्यांनी या ट्वीटमध्ये हॅशटॅग कोश्यारी हटाओ असे लिहिले आहे.
औरंगाबादमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 62 व्या दीक्षांत समारंभ सोहळ्यात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमा दरम्यान त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यावेळी भाषण करताना ‘आम्ही जेव्हा शिकत होतो, ते आम्हाला विचारत होते, तुमचा आवडता हिरो कोण आहे. आम्ही त्यावेळी सुभाषचंद्र बोस, नेहरू, गांधी जे चांगले वाटत असेल त्यांची नाव सांगत होतो. पण, आता महाराष्ट्रात तुम्हाला नवे हिरो मिळतील. शिवाजी महाराज जुन्या युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो आहेत, असे राज्यपाल कोश्यारी यांनी वक्तव्य केले होते. राज्यपालांच्या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यपालांच्या या वक्तव्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र लिहून राज्यपालांना हटविण्यात यावे अशी मागणी केली होती. पण कोणतीही कारवाई न झाल्यामुळे आता त्यांनी थेट सरकारला इशारा दिला आहे.
