अमरावती :
“केल्याने होत आहे रे; आधी केलेची पाहिजे” याचा प्रत्यय म्हणजे नाभिक समाजातील पुनम आणि सृष्टी या दोन बहिणी.
अमरावती जिल्ह्यातील वरूड तालुक्याच्या गव्हाणकुंड सारख्या छोट्या गावातील दोन मुलींनी अक्षरशः आकाशाला गवसणी घालणारे घवघवीत यश संपादन केले आहे.
सर्वसाधारण नाभिक कुटुंबात जन्मलेल्या या दोन सख्या बहिणींनी एमपीएससी परीक्षा द्वारे शासकीय सेवेत अधिकारी बनण्याचा बहुमान मिळविला आहे.
चिकाटी,आणि कठोर परिश्रम यातून यश हमखास मिळते हेच त्यांनी जगाला दाखवून दिले आहे.
राज्यभरातून या दोन्ही बहिणींचे कौतुक होत असून नाभिक समाजातील विविध मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
वरूड तालुक्यातील गव्हाणकुंड येथील दिवाकर नागपुरे या सलून व्यवसायिकाच्या या दोन्ही मुलींनी ही नेत्रदीपक कामगिरी करून यश संपादन केले आहे. मूळचे गव्हाणकुंड येथील रहिवासी असलेले दिवाकर नागपुरे सलून व्यवसायानिमित्त काटोल येथे गेले व तेथेच स्थायिक झाले.
नागतुरे यांनी अतिशय कठीण परिस्थितीवर मात करून आपल्या सलून व्यवसायाच्या मिळकतीतून पुनम आणि सृष्टी या दोन्ही मुलींच्या शिक्षणात कसलीही कसर ठेवली नाही.
मोठी मुलगी डॉ.पुनम नागपुरे हीची मागच्या वर्षी एमपीएससी मार्फत पशुधन विकास अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
दुसरी मुलगी कु.सृष्टी नागपुरे हिने नागपूर येथे मॅकनिकल इंजियनियरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुणे येथे आयटी कंपनीत नोकरी करीत असताना पुढील शिक्षण सुरूच ठेवले होते.
नुकताच एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला असून तिची आरटीओ विभागात निरीक्षक पदी नियुक्ती झाली आहे.
कठोर परिश्रम,अपार मेहनत,चिकाटी आणि उदिष्ट डोळ्यापुढे ठेवून या दोन्ही बहिणींनी हे आकाशाला गवसणी घालणारे यश संपादन केले आहे. नाभिक समाजातील विविध संघटनांकडून आणि समाज कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन केले जात असून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
” समाजातील जास्तीत जास्त मुलींनी एमपीएससी परीक्षेची तयारी जिद्दीने करावी,यश हमखास मिळतेच अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
प्रतिनिधी:राजेंद्र भोर बोरी
