नंदुरबार :

हंगामाच्या सुरवातीपासूनच खरिपातील पिके ही धोक्यात आहेत. सुरवातीला पावसाने ओढ दिल्याने जूनमध्ये होणाऱ्या पेरण्या ह्या जुलै महिन्यात झाल्या. हे कमी म्हणून की काय, पेरणी होताच सुरु झालेल्या पावसामध्ये तब्बल महिन्याभराचे सातत्य राहिले. या नैसर्गिक संकटातून खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग ही पिके सावरत असतानाच आता या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन फळधारणेच्या प्रसंगीच हा धोका निर्माण झाल्याने याचा थेट परिणाम उत्पादनावर होणार असल्याचे बोलले जात आहे. शिवाय आता गरजेच्या वेळी  पावसाने पाठ फिरवलेली आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांनी पिक पद्धतीमध्ये बदल करुन उत्पन्न वाढणवण्याचा जो प्रयत्न केला तो यशस्वी होणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे.

खरिपातील सर्वच पिकांवर रोगराई

खरीप हंगामातील सोयाबीन हे मुख्य पीक आहे. सोयाबीन पिकातून चार पैसे पदरी पडतात म्हणून मराठवाड्याबरोबर आता विदर्भातदेखील सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. मध्यंतरी पावसाचा धोका होता. आता पावसाने उघडीप दिली तर सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. राज्यात खरीप हंगामात सर्वाधिक पेरा हा सोयाबीनचा झाला असून याच पिकाला अधिकचा धोकाही आहे.

लष्करी अळीमुळे काय होते?

पीके बहरात असतानाच ह्या लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढत आहे. ही अळी थेट पिकांची पाने फस्त करते तर फळधारणेवरही या अळीचा प्रतिकूल परिणाम होतो. केवळ सोयाबीनच नाहीतर तूर, उडीद, मूग या पिकांचीही अशीच अवस्था आहे. एकदा का अळीचा प्रादुर्भाव झाला की, त्याचा प्रसारही झपाट्याने होत आहे. त्यामुळे वेळीच योग्य उपाययोजना करणे गरजेचे आहे.

काय आहे उपाययोजना?

पिकात हेक्टरी 20 ते 25 पक्षीथांबे उभा करावे लागणार आहेत. जेणेकरुन प्रादुर्भाव वाढणार नाही. तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी 10-12 कामगंध सापळे लावावेत तसेच सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीलाच 5% निंबोळी अर्काची फवारणी घ्यावी लागणार आहे. अळींचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी शेतकऱ्यांना घ्यावी लागणार आहे.

कृषी विभागाचीही महत्वाची भूमिका

हंगामाच्या सुरवातीलाच उत्पादन वाढीबाबत कृषी विभागाकडून मार्गदर्शन केले जाते, पण ऐन गरजेच्या वेळी कृषी अधिकारी हे शेतकऱ्यांकडे फिरकतच नाहीत. आता निसर्गाचा लहरीपणा आणि वाढत असलेला लष्करी अळीचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करुन दिलासा देण्याचे काम हे कृषी विभागाचे होते. पण याकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!