आंबेगाव :
समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समोर राजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिलीये. या घटनेने पुणे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून आंबेगाव तालुक्याचा बिहार झालाय का असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे.
मंचर शहरातील एस कॉर्नर परिसरात असणाऱ्या नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीच्या डेव्हलपरने त्याच्या अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी केल्याचा संशय, खेड वरून मीटर मधे हेराफेरी करणाऱ्या इसमांना बोलावून मीटर बायपास, वीज चोरी आदी गोष्टी करत असल्याचे चित्रीकरण केल्याचा संशय, तसेच नाविन्य रेसिडेन्सी या इमारतीमधील फ्लॅटची विक्री करून सदर ठिकाणी सोसायटीची नोंदणी न करता सदनिका धारकांची फसवणूक होत असून, ही फसवणूक संबंधित पत्रकार उघड करतात की काय असा संशय मनात ठेवून संतापून रामदास बबन जाधव, तनुजा बबन जाधव, अमोल आहेरकर आणि तुषार आहेरकर यांनी स्नेहा बारवे यांना शिवीगाळ, धक्काबुक्की करत जीवे ठार मारण्याची धमकी दिलीये. यासोबतच रामदास जाधव या इसमाने पत्रकार स्नेहा बारवे यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पत्रकार स्नेहा बारवे यांच्या हातावर जोरात फटका देखील बसला आहे.
या गुंडगिरी करणाऱ्या इसमांवर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, स्नेहा बारवे आणि समीर राजे यांच्यासारखे निर्भीड पत्रकारच जर सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य माणसाची काय अवस्था असेल असा सवाल आता विचारला जाऊ लागला असून, या गावगुंडांना नक्की कोणाचा वरदहस्त आहे आणि यांचा आका नक्की कोण हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.