ओतूर :
विक्रीसाठी गावागावात मूर्ती दाखल; सार्वजनिक मंडळाच्याही हालचाली वाढल्या गणेशोत्सवाचे जुन्नर तालुक्यातील ग्रामीण भागालाही वेग आला आहे. गणेशोत्सव १९ सप्टेंबर रोजी असून विक्रीसाठी गावागावांतून मूर्ती दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या हालचाली गतिमान झाल्या असून मूर्ती निश्चित करण्यापासून पदाधिकारी नियुक्तीची लगबग दिसून येत आहे.
ग्रामीण भागात गणेशोत्सव हा सर्वाधिक धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. ११दिवस सर्वत्र धार्मिक वातावरण पसरते. सकाळ,संध्याकाळ आरती,पूजा कार्यक्रम होतात. याची तयारी करण्यात येत आहे. पूर्वी गावातच,मूर्तिकार मूर्ती तयार करत असत. परंतु, अलीकडे विक्रीसाठी मूर्ती बाहेरून आणण्याचे प्रमाण वाढले आहे. अनेकजण यामध्ये गुंतले असून तालुका तर तालुक्याबाहेरून परिसरातून मूर्ती विक्रीसाठी आणण्यात येत आहेत.
१० हजार रुपये पर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. भाविक आपल्या आवडीनुसार मूर्ती खरेदीला प्राधान्य देत आहेत.
गणेश चतुर्थीला होणारी गर्दी लक्षात घेऊन आताच मूर्ती ठरविण्यासाठी कुटुंबे ओतूर, डींगोर येथे येत आहेत.अर्ध्या,एक फुटापासून तर दहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचा यामध्ये समावेश आहे. ब्राम्हणवाडा चौक,मोनिका चौक,नवीन व जुने स्टँड,बनकर फाटा,डिंगोर,आदी.गावांत ठिकाणी स्टॉल उभारले आहेत. स्थानिक सार्वजनिक मंडळांची लगबग शहराप्रमाणे ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या वाढली आहे. गणेशोत्सव अवघ्या ९ दिवसांवर येऊन ठेपल्याने कार्यकर्ते सक्रिय होत आहेत. पदाधिकारी निवडीपासून मूर्ती ठरवण्याची धावपळ सुरू आहे.मूर्तिकारांचे प्रमाण कमी झाले आहे. बाहेरून मूर्ती आणून विक्रीचे प्रमाण वाढले आहे. बाहेरून आणण्यात येणाऱ्या मूर्ती आकर्षक असल्याने त्यांना भाविकांकडून पसंती देत आहेत.
फैय्याज इनामदार
तालुका प्रतिनिधी जुन्नर
