ओतूर :

ग्रंथाली प्रकाशित आणि संजय नलावडे लिखित ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल १६ डिसेंबर रोजी नंदलाल लाॅन्स, ओतूर येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत शिवशाही थाटात संपन्न झाला. याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना,’काळाच्या पडद्याआड गेलेल्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या जीवनचरित्रांचे दस्तऐवजीकरण होणे गरजेचे आहे, संजय नलावडे यांनी जुन्नर तालुक्यातील महनीय व्यक्तींना ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकात स्थान देऊन महत्वाचे काम केले आहे’ असे उद्गार जगप्रसिद्ध चित्रकार दत्तात्रय पाडेकर यांनी काढले. समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळांकूरकर यांनी,’संजय नलावडे यांनी लिहिलेल्या ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातील काही लेखांना मराठी पाठ्यपुस्तकात स्थान मिळाले पाहिजे’ असे सांगितले.

‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकात साकारलेल्या शिवजन्मभूमीतील अडतीस व्यक्तिमत्वांना मानवंदना देण्यासाठी ही पुस्तकं पालखीतून मंगलवाद्य आणि तुतारीच्या निनादात मंचावर आणण्यात आली. शिवनेरीभूषण डॉ. सदानंद राऊत, शिवनेरीभूषण मा. विनायक खोत, शिवनेरीभूषण माजी सैनिक रमेश खरमाळे, मा. किरण कबाडीसाहेब, वरिष्ठ पोलीस अधिकारी ठाणे, इंजिनिअर शिवाजीराव चाळकसाहेब, शिवांजली साहित्यपीठ अशा अनेक दिग्गजांनी ही पालखी व ‘शिवनेरीची श्रीमंती’ खांद्यावर घेतली आणि खऱ्या अर्थाने आजच्या कर्तृत्ववान पिढीने आधीच्या पिढीतील कर्तृत्ववान मान्यवरांना मानवंदना दिली.. याप्रसंगी शिवजन्मभूमीचा उगवता तारा गायक मयुर सुकाळे यांनी पोवाडा सादर केला तेव्हा संपूर्ण वातावरणात चैतन्य संचारले तर छोट्या दुर्गराज खोत याने गारद दिली तेव्हा सर्वांच्याच अंगावर रोमांच उभे राहिले.

 

सुरवातीला पाहुण्यांचे औक्षण, गणेशपूजन, दिपप्रज्वलनाने समारंभ सुरू झाला. विविध क्षेत्रात देदीप्यमान कामगिरी केलेल्या ‘शिवनेरीची श्रीमंती’ पुस्तकातीलच सौ. संगीता जोशी, मराठीतील पहिल्या स्त्रीगझलकार, द. स. काकडे, ज्येष्ठ कादंबरीकार, अशोक डुंबरे, दुरदर्शन निर्माते, वसंतराव पोखरकर, उद्योजक, डॉ. प्रकाश खांडगे, लोककला अभ्यासक, भास्कर हांडे, चित्रकार आणि सुदेश हिंगलासपूरकर, विश्वस्त, ग्रंथाली प्रकाशन या दिग्गज मान्यवरांच्या शुभहस्ते ‘शिवनेरीची श्रीमंती’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘उगवत्या सुर्याला नमस्कार करण्याच्या या युगात मावळतीच्या सूर्याला मुजरा करण्याची प्रेरणा मला लहानपणापासून घराच्या अंगणातून बुडणाऱ्या सुर्यामुळे अतिशय तेजस्वी दिसणाऱ्या किल्ले शिवनेरीच्या आशिर्वादाने मिळाली’ असे उद्गार लेखक संजय नलावडे यांनी ‘शिवनेरीची श्रीमंती’ या प्रकाशन सोहळ्यात काढले. याप्रसंगी पुस्तकातील हयात नसलेल्या महनीय व्यक्तींच्या नातेवाईकांचाही लेखकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

श्री. संजय नलावडे हे मुळचे शिवजन्मभुमी जुन्नर तालुक्यातील परंतु नोकरी व्यवसायानिमित्त मुंबईमध्ये ते राहत असले तरी आपल्या जन्मभूमीशी त्यांची नाळ घट्ट रुतलेली आहे. सदर व्यक्तीचित्रणात्मक ग्रंथांमध्ये त्यांनी आपल्याच जुन्नर तालुक्यात जन्माला आलेल्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या कार्याचा डोलारा उभारून दीपस्तंभाप्रमाणे पुढील पिढ्यांना प्रकाशवाटा दाखवल्या अशा महान व्यक्तींची चरित्रात्मक कहाणी वाचकांच्या पुढ्यात ठेवली आहे. ‘संजय नलावडे यांच्या परिपूर्ण लेखनशैलीमुळे जुन्नर तालुक्यातील अनेक दिवंगत व्यक्तीमत्वांचा समावेश राज्यशासनाच्या मराठी विश्वकोशात झाला’ असे गौरवपूर्ण उद्गार लोककला अभ्यासक डॉ.ज्प्रकाश खांडगे यांनी काढले.

 

 

याप्रसंगी नरेंद्र वाबळे, अध्यक्ष मुंबई मराठी पत्रकार संघ, उद्योगपती विकासजी दांगट, ह.भ.प. गंगारामबुवा डुंबरे, ज्येष्ठ साहित्यिक सुधाकर घोडेकर, डॉ. ज्ञानेश्वरमाउली थोरात, डॉ. लता पाडेकर, ज्येष्ठ पत्रकार नरेंद्र डुंबरे, सचिन कांडगे, वरिष्ठ अधिकारी, ओतूर, सुरेश हांडे, साहित्यिक, कवयित्री रश्मी घोलप, ज्येष्ठ पत्रकार भरत अवचट, अनिलशेठ तांबे, मोहितशेठ ढमाले, देविदास तांबे, नंदुशेठ भोर, जालंदर उकिर्डे, पोपटराव नलावडे, धनंजय कुलवडे आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अतिशय सुंदर सूत्रसंचालन कवी संजय गवांदे यांनी केले

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!