आळेफाटा ( वार्ताहर )
आळेफाटा पोलीस स्टेशन व आरटीओ विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ते अपघात विरोधक चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.परिवहन आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशांव्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड अंतर्गत महाराष्ट्रातील सर्वच पोलीस स्टेशनमध्ये रस्ता सुरक्षा ड्राईव्ह चे आयोजन करण्यात येत असते. त्यानुसार प्रत्येक पोलीस स्टेशन अंतर्गत मोटर वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत ज्या ज्या ठिकाणी अपघात घडतात त्या ठिकाणचे ब्लॅक स्पॉट्स शोधून काढणे, त्यावर प्रभावी उपाययोजना करणे त्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली आहे.


त्यानंतर केलेल्या अभ्यासानुसार जानेवारी 2023 ते आज पर्यंत झालेल्या अपघातात जवळपास 15 लोकांनी जीव गमावला आहे. त्यानुसार नगर-कल्याण रस्त्यावर जवळपास 11 जणांनी जीव गमावला आहे.त्यानुसार लवणवाडी, राजुरी सह्याद्री इंजीनियरिंग कॉलेज जवळ, बेल्हा समर्थ इंजीनियरिंग कॉलेज जवळ, आणे रानवारा हॉटेल जवळ असे ब्लॅक स्पॉट्स नोंदविण्यात आलेले आहेत.मुख्यतः जास्तीत जास्त अपघात हे वळण रस्त्याला झालेले आहेत त्यानुसार आवश्यक ठिकाणी डिव्हायडर टाकणे, रमलर स्ट्रीप टाकणे, ब्लींकर टाकणे, रस्ता दिशादर्शक फलक लावणे याबाबतचा अहवाल समितीमार्फत शासनाला सादर केला जाणार आहे.नगर कल्याण रस्त्यावर अपघातात तीन पादचारी व्यक्तींचा मृत्यू झाला, त्यानुसार रस्त्याने पायी चालणाऱ्या लोकांनी एका बाजूने चालणे, मद्यपान न करता गाडी चालविणे, दुचाकी चालकांनी वाहन चालविताना हेल्मेट चा वापर करणे, सर्वच दुचाकी चार चाकी वाहनांनी वाहन चालवताना वाहतुकीचे नियम पाळणे आवश्यक आहे सर्वांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघात घडण्याची शक्यता ही खूप कमी असते असे निरीक्षण नोंदविण्यात आले.

गावातील मुख्य रस्त्यावर येणाऱ्या वाहनांनी मुख्य रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा अंदाज घेऊन कमी गतीने वाहन मुख्य रस्त्यावर घेणे अशा विविध रस्ता सुरक्षाविषयक जनजागृतीपर सूचना करण्यात आल्या.यावेळी सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नावडे, आळेफाटा पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, सहायक पोलीस निरक्षक सुनील बडगुजर, परिवहन विभागाचे मोटार वाहन निरीक्षक तान्हाजी धुमाळ व त्यांचे सहकारी स्टाफ सहायक मोटार वाहन निरीक्षक तेजश्री कुलकर्णी आदी उपस्थित होते.
