आळेफाटा :
इंसानियात अभियान रॅलीचे आळेफाटा येथे सुयोग डायग्नोस्टिक सेंटरच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनी दिनांक 19 फेब्रुवारी रोजी नागपूर येथून सुरू झालेल्या रॅलीचा समारोप आझाद हिंद मैदान येथे 14 मार्च रोजी समारोप होणार आहे.या रॅलीचे मुख्य आयोजक मुफती सालीम यमनी चाऊस हे आहेत.समाजामधील काही विघ्नसंतोषी व्यक्तींच्या माध्यमातून व्हाट्सअपद्वारे धर्म आणि जातीबद्दल आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला जातो. यामुळे समाजा-समाजामध्ये फुटीचे राजकारण घडत आहे.हे टाळण्यासाठी समाजामध्ये भाईचारा कायम राहण्यासाठी समाजातील सर्व जाती-धर्माच्या व्यक्तींना एकत्रित ठेवण्यासाठी एकमेकांविषयी प्रेम, आदर ह्या भावना अबाधित राहण्यासाठी नफरत छोडो भारत जोडो ह्या उदात्त हेतूने या रॅलीचे आयोजन करण्यात आले.यावेळी सुयोग डायग्नोस्टिक सेंटरचे राजेंद्र बोऱ्हाडे, शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक मुलानी सर, रोटरी प्रेसिडेंट संपत रहाणे, वडगाव आनंद तंटामुक्ती अध्यक्ष व माजी ग्रामपंचायत सरपंच कैलास वाळुंज, सामाजिक कार्यकर्ते डी बी वाळुंज, ग्रामपंचायत सदस्य वैशाली देवकर, दक्षता समिती सदस्य दिपाली गडगे, झुंजार छावा प्रदेशाध्यक्ष नवनाथ चासकर आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते.

या रॅलीचे सर्वेसर्वा मुफ्ती सालीम यमनी चाऊस यांनी असे मनोगत व्यक्त केले की,आम्हा भारतवासीयांना सुरक्षा व प्रगती हवी आहे.आम्हा सर्व भारतवासीयांमधून हिंदू मुस्लिम शेख ईसाई सर्व जाती धर्माविषयी चा द्वेष संपवायचा आहे, आपसाआपसामध्ये बंधुत्व, मानवता,प्रेम स्थापन करायचे आहे.आपले राजकीय पक्ष,धर्म वेगळे असू शकतात, परंतु आपला मानवता हा एकमेव धर्म आहे.आपण वेगवेगळ्या जाती-धर्माच्या सर्व लोकांना एकत्रित घेऊन, वेगवेगळ्या राजकीय पक्षाच्या लोकांना एकत्रित घेऊन मानवतेने परिपूर्ण भारत घडविण्यासाठी मानवता, एकता व अखंडता अबाधित ठेवणारा भारत देश आपल्याला बनवायचा आहे असे आपल्या मनोगतमध्ये नमूद केले.सुयोग डायग्नोस्टिक सेंटर चे राजेंद्र बोऱ्हाडे यांची कन्या श्रावणी बोऱ्हाडे व ग्रामस्थांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन मुफती सलीम यमनी चाऊस यांचा सत्कार करण्यात आला.
