बारामती:-

पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले. यावेळी शरद पवारांसह अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

राज्यभर मोठ्या उत्साहात दिवाळीचा सण साजरा केला जात आहे. आज दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकत्रच आहे. दिवाळी पाडवा हा महत्त्वाचा मुहूर्त मानला जातो. बारमतीत पवार कुटुंबियांकडून मोठ्या उत्साहात दरवर्षीच दिवाळीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी पाडव्याच्या दिवशी पवार कुटुंबियांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी राज्याच्या विविध भागातून कार्यकर्ते गोविंद बागेत येत असतात. यावर्षी देखील मोठ्या संख्येनं कार्यकर्ते गोविंद बागेत दाखल झाले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार , खासदार सुप्रिया सुळे , आमदार रोहित पवार , पार्थ पवार यांनी शुभेच्छा स्वीकारल्या.

दिवाळीनिमित्त पवार कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा देण्याकरिता राज्यभरातून नागरिक बारामतीतील गोविंद बागेत पाडव्याच्या दिवशी येत असतात. यावर्षी देखील कार्यकर्ते दाखल झाले होते. याची जय्यत तयारी गोविंद बागेत करण्यात आली होती. तबब्ल दोन वर्षानंतर गोविंद बागेत पाडवा साजरा होत आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची देखील मोठी गर्दी यावेळी पाहायला मिळाली. सकाळी 8 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत पवार कुटुंबियांनी प्रत्यक्ष भेटून नागरिकांच्या शुभेच्छा स्वीकारल्या.

अजित पवार यांच्याकडून सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा

दरम्यान, यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी अजित पवार यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वाचे आभारही मानले. पवार साहेब दरवर्षी लोकप्रतिनिधी म्हणून सर्वांना भेटतात. आम्हीही सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि मी लोकप्रतिनिधी आहोत. त्यामुळं आम्हीही लोकांना भेटतो. सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल अजित पवारांनी आभार मानले. फोटोला यावेळी आम्ही मर्यादा आणल्या होत्या. गर्दीमुळे फोटो काढणे शक्य झाले नाही. त्यामुळं कोणी गैरसमज करुन घेवू नये असे अजित पवार यावेळी म्हणाले.

अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान

अतिवृष्टीमुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. खरीपाची पिकं वाया गेली आहेत. शेतकरी परेशान झाले असल्याचे अजित पवार म्हणाले. आज सण आहे. त्यामुळं पॅालिटिकल विचार करु नका. मी दिवाळी संपल्यावर यावर बोलेन असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!