पूजेसाठी लागणारी तसेच सजावटीची फुले, केवडय़ाचे पान, कमळ, दुर्वा, तुळशी, पत्री यांना सध्या चांगली मागणी आहे. काल हरतालिका असल्याने बाजारपेठेत महिलांची देखील गर्दी दिसत होती . गणेश उत्सवाच्या निमित्याने सार्वजनिक गणेश मंडळात देखावे तयार केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे.
‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज , बाप्पांच्या आवडत्या दिवशी म्हणजेच बुधवारी घरोघरी आणि शहरातील विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपतीची प्रतिष्ठापना होणार आहे. गणेशोत्सवामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील विविध सार्वजनिक मंडळात देखावे निर्माण केले जात असून त्यावर अंतिम हात फिरविला जात आहे. तसेच घरोघरी गणपतींच्या आगमनाची तयारी केली जात आहे. मुंबईमध्ये लालबाच्या राजाची पहिली झलक पाहायला मिळाली आहे. नागपुरात चितारओळीमधून सकाळपासून ढोलताशांच्या निनादात शहरातील आणि शहराच्या बाहेर गणपतींची मूर्ती नेली जात असल्यामुळे या भागात लोकांची गर्दी वाढली आहे. बाप्पांच्या आगमनाची तयारी आज सुरू असून विविध भागात मूर्तीची विक्री करणारे शेकडो स्टॉल शहरात लागले आहेत. पूजेच्या तयारीसाठी लागणारे साहित्य, तसेच मूर्ती खरेदीसाठी सर्व बाजारपेठेमध्ये गर्दी दिसून येत आहे.
पूजेची तयारी अशी करा
गणेशाची छोटी मूर्ती, श्रीफळ, कापड, कापसाची माळा, हार, सुट्टी फुले व नाणी, अत्तर, गूळ-खोबरे, सुपारी, देठाची पाने, मिठाई, मोदक, कापसाचे वस्त्र, अगरबत्ती, कापूर, दूर्वा, हळदी-कुंकू-अबीर-गुलाल, दिवा, तेल, समई, वाती, फळे, पंचामृत, नैवेद्य, चंदन, अष्टगंध, पळी, पंचपात्र, जानवे, शमीपत्रे, आंब्याची डहाळी, ताम्हण, कलश, शंख, घंटा, अक्षता आदी साहित्य लागतात.
अंधेरीच्या राजाचे दर्शन दुपारी
अंधेरीचा राजा म्हणून प्रसिद्ध बाप्पाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झाली असून आज दुपारी 1 च्या नंतर बाप्पाचे दर्शन सुरू होणार आहे. अंधेरीच्या राजाची 1966 साला स्थापना करण्यात आली आहे. तेव्हा पासून हा राजा नवसाला पावतो अशी आख्यायिका गणेश भक्तात आहे. आज पहिल्या दिवशी 11.30 ते 12.20 वाजता विधिवत पूजा करून 12.30 ते 1 वाजेपर्यंत आरती आणि 1 च्या नंतर गणेशभक्तांसाठी बापांचे दर्शन खुले होणार आहे.
काकड आरतीला प्रचंड गर्दी
प्रभादेवीतील सिद्धिविनायकाचा गाभारा फुलांनी सजवला आहे. भाविक लांबून लांबून आज सिद्धिविनायक चरणी लीन होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज पहाटे 5 वाजता काकड आरती झाली. यावेळी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. त्यामुळे गाभाऱ्यात भक्तिमय वातावरण झालं होतं. गेल्या दोन वर्षांच्या कोरोनाच्या निर्बंधानंतर गणेश भक्त जल्लोषात दिसत आहे.
गणपतीपुळेत भाविकांची रांगच रांग
भाद्रपद गणेश चतुर्थीला रत्नागिरीतील प्रसिद्ध गणपतीपुळे मंदिरात भाविकांना गाभाऱ्यात जाऊन चरणस्पर्श करण्याची मुभा असते. 150 वर्षातून ही प्रथा सुरू आहे. वर्षातून एकदाच भाविकांना ही संधी मिळते. गणपतीपुळे येथे श्रींच्या दर्शनासाठी सकाळपासूनच ग्रामस्थांची गर्दी झाली आहे. पहाटे 4.30 पासून ते दुपारी 12.30 पर्यंत भाविकांना या दर्शनाचा लाभ घेता येणार आहे. गणपतीपुळे पंचक्रोशीत कुठेही घरी गणपती आणला जात नाही. त्यामुळे ग्रामस्थांना दर्शन सुलभ व्हावे यासाठी सुरू केलेली प्रथा आहे.
दगडूशेठ हलवाई गणपतीला तोबा गर्दी
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची पहाटेपासून गर्दी झाली आहे. दगडूशेठ गणेशोत्सवाचे यंदाचे 130 वे वर्ष आहे. शिवाय कोरोनाच्या संकटानंतर दोन वर्षाने गणपती उत्सव साजरा होत असल्याने पुणेकरांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी तोबा गर्दी केली आहे. श्री पंचकेदार मंदिरात यंदा बाप्पा विराजमान होणार आहे. 11:37 वाजता श्री महेशगिरी महाराजांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
खैरेंच्या हस्ते पूजा
औरंगाबादचे ग्रामदैवत संस्थान गणपतीच्या प्रतिष्ठापनेला सुरुवात झाली. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते प्रतिष्ठापना पूजा झाली. दुपारच्या सुमारास होणार संस्थान गणपती प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी औरंगाबादमधील भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती.
नागपूरच्या राजाची विधीवत पूजा
नागपूरच्या राजाची सकाळीच पूजा करण्यात आली. मंत्रोचारणेसह बाप्पाच्या स्थापनेला सुरवात झाली. नागपूरचा राजा नागपूरकरांचं दैवत म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या गणपतीला भाविकांची मोठी गर्दी असते.आज विधिवत पूजा करून बाप्पाची स्थापना करण्यात आली. नागपूरचा राजाला दर वर्षी सुवर्ण अलंकारांनी सजविण्यात येते. यंदाही ही परंपरा कायम आहे.
कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत जल्लोष
लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गणेशभक्त कोल्हापूरच्या कुंभार गल्लीत दाखल व्हायला सुरवात झाली आहे. गणेश फक्त सहकुटुंब कुंभार गल्लीत येत आहेत. वाद्याच्या गजरात बाप्पाचं स्वागत केलं जात आहे. कोरोनाच्या निर्बंधमुक्ततेमुळे बाप्पाचं घरोघरी आगमन होताना दिसत असून भाविकही जल्लोष करताना दिसत आहेत.
