यंदा पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्यावर नागरिकांचा भर दिसून येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. गेली दोन वर्षात आपण कोरोना साथीमुळं गणेश उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करु शकलो नाहीत. पण या वर्षी सर्वत्र गणेश उत्सव भक्तिभावाने आणि आनंदाने साजरा केला जात आहे. 1 जुलै 2022 पासून सिंगल यूज प्लास्टिकचा वापर, उत्पादन आणि वितरण यावर बंदी घालण्यात आली आहे. उत्सवाच्या निमित्तानं मी आपणाला विनंती करतो की, या प्लास्टिकमुळं होणार प्रदूषण थांबवण्यासाठी आपण निश्चय करुयात आणि सिंगल यूज प्लास्टिकचा दैनंदिन वापर बंद करुयात, असं आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, सिंगल यूज प्लास्टिकचा वापर बंद करुयात आणि पर्यावरण पूरक गणेश उत्सव साजरा करुयात, सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गणपतीच्या आशीर्वादानं कोरोनाचं संकट दूर झालं आहे. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव आपण करत आहोत. गणरायाचं स्वागत करताना महाराष्ट्राच्या विकासाचा पुनश्च श्रीगणेशा करुयात. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करुयात. आरोग्य, शिक्षण, पर्यावरण अशा विविध विषयांवर गणेश मंडळांनी जनजागृती करावी, असं आवाहन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.