आळेफाटा (वार्ताहर) :
आळेफाटा येथे अंदाजे गेल्या 35 वर्षांपासून सुरु असलेल्या गोल्डन बेकरी मधील बेकरी पदार्थांमध्ये जिवंत अळ्या आढळून आल्याने आळेफाटा परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड खळबळ उडालेली असून सदरहू बेकरी तात्काळ बंद करण्यात येऊन बेकरी मालकावर तात्काळ गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. याबाबतीत मुख्य तक्रारदार संदेश काशिकेदार व नवनाथ चासकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार दि 5 ऑक्टोबर रोजी गोल्डन बेकरी येथे रोट विकत घेतले असता त्यात जिवंत अळ्या आढळून आल्याने सदरची बाब गोल्डन बेकरी चालकाच्या लक्षात आणून दिली असता त्याने अरेरावी व शिवीगाळ करत तक्रारदार यांना हाकलवून दिले. त्यानंतर तक्रारदार यांनी आळेफाटा पोलिसांशी संपर्क साधला असता सदरचा गुन्हा अन्न व भेसळ कार्यालयच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. त्यांनतर अन्न व औषध प्रशासन अधिकारी राहुल खंडागळे यांनीही आपल्या कर्तव्यात कसूर करत बेकरी मालकाला पाठीशी घातले. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र आळे येथे आरोग्य निरीक्षक रोहिदास मुंजाळ यांना लेखी तक्रार केली असता आरोग्य निरीक्षक रोहिदास मुंजाळ यांनी सदर रोट खाद्य पदार्थाचे नमुने सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा पुणे येथे पाठविले असता दि 12 ऑक्टोबर रोजी रोट मध्ये मृत अळ्या आढळ्याचा अहवाल देत सदर खाद्य पदार्थ मानवी आरोग्यास खाण्यास हानिकारक अपायकारक असल्याचा अहवाल दिला.
त्यानुसार तक्रारदार संदेश काशिकेदार, नवनाथ चासकर, नवनाथ वाळुंज यांनी बेकरी परवाना रद्द करून बेकरीला कायमस्वरूपी सील लागणेबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त यांच्याकडे तक्रार केली असता आयुक्त ए एस गवते यांनी उपलब्ध तक्रार अर्ज व प्रयोगशाळा अहवालयाची खातरजमा करत दि 24 नोव्हेंबर रोजी गोल्डन बेकरीचा परवाना रद्द करत असलेबाबतचा आदेश काढला. मात्र गोल्डन बेकरी आजमितीस ही राजरोस सुरु असून मानवी आरोग्यास हानिकारक गोष्टींचा अद्यापही सर्रास विक्री सुरु आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासन आयुक्त ए एस गवते ह्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 24 डिसेंबर रोजी बेकरीला टाळे मारणार असल्याचे सांगितले. याबाबत जर बेकरी परवाना रद्द केला आहे तर मग इतर पदार्थ विक्रीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ का ? बर 24 डिसेंबर रोजी नक्की बेकरीला टाळा लागणार की आजमितीस सुरु असलेली बेकरी भविष्यातही सुरु राहणार ? असे अनेक प्रश्न प्रशासनाच्या उदासीन गोष्टींमुळे उपस्थित होत आहे.
मागील काळात बिकानेर बेकरी याठिकाणीही ऑक्टोबर 2022 मध्ये केक मध्ये अळ्या आढळून आल्या होत्या मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक देवाण – घेवाण करीत प्रकरण दाबण्यात यश आले. सदरहू गोल्डन बेकरीचे मालक अन्सारी यांचे बड्या व्यक्तींसोबत लागेबांधे असून प्रकरणावर पडदा टाकण्याच्या दृष्टीने त्यांचे आटोकाट प्रयत्न असून तक्रारदार यांनी आम्ही कोणत्याही परिस्थितीत मॅनेज होणार नसून सदर बेकरी मालकाची बेकरी बंद करण्यात येऊन कायमस्वरूपी सील लागावे व बेकरी मालकावर कठोरात कठोर गुन्हा दाखल होऊन दंड करण्यात यावा अशी मागणी तक्रारदार यांनी केली.
जुन्नर तालुक्यातील इतर ही परवानाधारक बेकऱ्यांची तपासणी होऊन इतर दोषी बेकरीवर कारवाई होऊन त्यांचा परवाना रद्द होऊन बेकरी सील करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी जनसामान्य नागरिकांमधून होत आहे.
प्रतिनधी :- मनीष गडगे
