ओतूर :
महात्मा जोतिबा फुले यांनी 150 वर्षांपूर्वी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आहे. परंतु सध्याची परिस्थिती पहाता देशात आणि समाजात त्याच विचारांची गरज सध्या निर्माण झाली असून ही चळवळ पुन्हा नव्याने बळकट केली पाहिजे असे मत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. सत्यशोधक समाज स्थापनेला 150 वर्ष ,तसेच कर्मवीर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची 150 वी जयंतीचे औचित्य साधून मुंबई मराठी पत्रकार संघ,आझाद मैदान येथे एक दिवसीय आधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.
ओतूर येथील श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ व दैनिक शिवनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, शेकापचे आमदार जयंत पाटील,माजी खासदार हरिभाऊ राठोड, माजी आमदार प्रकाशबापू शेंडगे, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नरेंद्र वाबळे, गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशालभाऊ तांबे, सचिव वैभव तांबे, प्रा.एस.व्ही.जाधव, ऑड.आप्पासाहेब देसाई, रोहिदास लोखंडे, सुधाकर डुंबरे, पत्रकार नरेंद्र डुंबरे,संजय नलावडे,बाळासाहेब डुंबरे, शरदराव ताजणे,प्रमोद पानसरे, संजय देवकर, संतोष झावरे,विनायक पवार, आदी मान्यवरांसह जुन्नर तालुक्यातून ओतूर येथील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
ओतूर येथील कै.भाऊ कोंडाजी डुंबरे, बाळाजी कुसाजी डुंबरे, नारोबाबा महाधट पानसरे, धर्माजी रामजी डुंबरे, भीमराव महामुनी,गणू बापूजी डुंबरे, चिमनाजी मथाजी डुंबरे, लक्ष्मण गणुजी शेटे, विठ्ठल वंडेकर, माधवराव रोकडे जुन्नर तालुक्यातील आदी तत्कालीन युग पुरुषांनी सत्यशोधक समाज चळवळीसाठी महात्मा ज्योतिराव फुले यांना साथ दिली होती. महात्मा फुले यांनी त्यावेळी ज्या शाळा सुरू केल्या होत्या त्यातील चौथी शाळा ओतूर येथे 5 डिसेंबर 1848 साली सुरू केली असून अद्यापही सुस्थितीत आहे. 1884 साली बाळाजी कुसाजी डुंबरे यांनी आपल्या दोन मुलींचे विवाह पुरोहितांशिवाय सत्यशोधक पध्दतीने केले होते. त्यावेळी त्यांच्या विरूद्ध ब्राम्हणांनी कोर्टात दावा दाखल केला होता. परंतू अंतिम निकाल सत्यशोधक समाजाच्या बाजूने लागला होता.
यावेळी ‘सत्यशोधकांचे ओतूर’ जी. ए.उगले यांनी लिहीलेल्या पुस्तकाच्या दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विशालभाऊ तांबे यांनी केले. प्रमुख मान्यवरांचे स्वागत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष दैनिक शिवनेरचे संपादक नरेंद्र वाबळे यांनी केले.
फैय्याज इनामदार
प्रतिनिधी
