आळंदी :

पालखी सोहळ्याला काही प्रमाणात गालबोट लागलं आहे. पालखी सोहळ्यादरम्यान वारकरी आणि पोलिसांमध्ये वाद झाला आहे. मंदिरातील प्रवेशावरुन हा वाद झाला आहे.  संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्या दरम्यान तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. पोलिसांकडून काही प्रमाणात वारकऱ्यांवर लाठीमार करण्यात आला त्यानंतर हा वाद मिटला. मात्र या वादानंतर पोलिसांकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा लाठीमार झाला नसून झटापट झाल्याचं पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं आहे.

पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितलं की, पालखी प्रस्थान सोहळा हा दरवर्षी आयोजित होतो. आजही मानाच्या 56 पालख्या आल्या होत्या. गेल्यावर्षी चेंगराचेंगरीची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यावेळी काही महिलासुद्धा जखमी झाल्या होत्या. त्यामुळे यावर्षी प्रधान जिल्हा न्यायाधीश, धर्मादाय आयुक्त, मंदिर प्रमुख विश्वस्त यांच्यासोबत 3 वेळा बैठका घेऊन गेल्यावर्षीसारखी परिस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून प्रत्येक मानाच्या पालखीतील प्रत्येकी 75 जणांना प्रवेश देण्याचा निर्णय पूर्वीच घेण्यात आला आणि तसे नियोजनसुद्धा करण्यात आले.

पोलीस आयुक्त पुढे बोलताना म्हणाले की,  मानाच्या दिंडीप्रमुखांनी सुद्धा तो मान्य केला. त्यानुसार पासेस वितरित करण्यात आले. मुख्य म्हणजे सर्व मानाच्या दिंडी प्रत्येकी 75 जणांनाच पाठवित होते. मात्र आज अचानक काही स्थानिक युवकांनी मध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. मंदिर विश्वस्त आणि चोपदार सुद्धा त्यांना समजावण्यासाठी आले. पण ते युवक ऐकत नव्हते. बॅरिकेड तोडून त्यांनी आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या स्थानिकांशी केवळ किरकोळ झटापट झाली, पोलिसांनी लाठीचार्ज किंवा बळाचा वापर केलेला नाही. त्यामुळे लाठीचार्ज केला, हे म्हणणे खोटे आहे. सर्व वारकरी, प्रशासनाला उत्तम सहकार्य करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची उच्च परंपरा असलेल्या वारीला उगाच गालबोट लावण्याचा प्रयत्न कुणी करू नये, ही विनंती त्यांनी केली आहे.

नेमकं काय घडलं होतं?

पालखी प्रस्थानादरम्यान मानाच्या पालख्यांनाच फक्त प्रवेश दिला जातो. याच मानाच्या दिंंड्या मंदिराच्या जवळ असतात. मात्र ऐनवेळी या दिंंडीतील मोजक्या लोकांना मंदिराच्या आत प्रवेश देण्यात आला. त्यामुळे दिडींतील इतर वारकरी नाराज झाले. ते मंदिरात जाण्यासाठी गर्दी करत होते. याचवेळी पोलिसांमध्ये आणि दिंडीतील वारकऱ्यांमध्ये वाद झाला.या पालखी सोहळ्यासाठी शेकडो पोलीस तैनात करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि सुरक्षेसाठी पोलीस फाटा तैनात करण्यात आला आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!