पुणे :
पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. तर काही परिसरात गारपिटीला सुरुवात झाली आहे. अचानक आलेल्या या पावसाने अनेक पुणेकरांची तारांबळ उडाली आहे. दिवसभर पुण्यात उकाडा जाणवत होता. मात्र पावसामुळे पुणेकरांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. भुगाव, सांगवी, औंध या परिसरात गारपीट झाली तर बाकी परिसरात मुसळधार पावसानं हजेरी लावली.
त्यासोबतच पिंपरी चिंचवडमध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय उकाड्याने हैराण झाले होते. आज सकाळपासूनही उन्हाच्या झळा बसत होत्या. अशातच सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळं नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. या पावसामुळं परिसरात गारवा निर्माण झाल्यानं शहरवासीय मात्र सुखावले आहेत.
पुढील पाच दिवस पुण्यातील वातावरण कसं असेल?
पुढील पाच दिवस पुण्यात काही प्रमाणात ऊन आणि काही प्रमाणात पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. उद्या (30) दिवसभर काही प्रमाणात ऊन असेल मात्र संंध्याकाळी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यानंतर पुढील चार दिवस आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे आणि काही प्रमाणत पावसाचीदेखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसामुळे वाहतूक कोंडी
वाहतूक कोंडी ही पुण्यातील सगळ्या मोठी समस्या बनली आहे. ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. मात्र वाहतूक कोंडी संपायचं नाव घेत नाही आहे. त्यातच पाऊस झाला तर रस्ते तुंबतात आणि मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. संध्याकाळी पुण्यात पाऊस झाला, मात्र या पावसामुळे पुण्यातील अनेक रस्त्यांवर वाहतूक कोंडी बघायला मिळाली. सेनापती बापट रोड, फर्ग्यूसन रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रोड, कोथरुड, वनाज आणि चांदणी चौक परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती.
उन्हापासून पुणेकरांना दिलासा…
मागील काही दिवसांपासून पुण्यात सातत्याने तापमानात वाढ होत होती. तापमानाचा पारा 40 अंशावर पोहचला होता. त्यामुळे पुणेकर हैराण झाले होते. तापमान वाढत असल्याने पुण्यात हीट वेव्ह येणार का?, असा प्रश्न अनेक पुणेकरांना पडला होता. मात्र अशी कोणत्याही प्रकारची हीट वेव्ह येणार नसल्याचं हवामान खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं होतं. आज आलेल्या पावसाने पुणेकरांना मात्र चांगलाच दिलासा मिळाला आहे.
चाकणमध्ये प्रवासाची वाहतुकीवर परिणाम
औद्योगिक क्षेत्र नागरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चाकणमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला. पुणे नाशिक महामार्गासह औद्योगिक क्षेत्रात वादळी वारे वाहू लागले. चाकणमध्ये काही ठिकाणी पत्राशेड कोसळली असून शेडखाली दुचाकी अडकल्या आहेत. याचा प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
गारवा झाला, शहरवासीय सुखावले
पिंपरी चिंचवडमध्येही मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून शहरवासीय उकाड्याने हैराण झाले होते. सकाळपासूनही उन्हाच्या झळा बसत होत्या. अशातच सायंकाळी ढग दाटून आले आणि पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली. मात्र, या पावसामुळे परिसरात गारवा निर्माण झाल्याने शहरवासीय मात्र सुखावले आहेत.
पावसाने उडविली वऱ्हाडी मंडळीची त्रेधातिरपीट
नाशिकच्या येवलामध्ये अंकाई, तांदुळवाडी फाटा, आहेरवाडी या गावांसह परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह गारांचा दमदार पाऊस झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना यामुळे दिलासा मिळाला.अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. येवल्यात अनेक ठिकाणी लग्न समारंभाचे कार्यक्रम होते. अचानक आलेल्या पावसामुळे वऱ्हाडी मंडळीची त्रेधातिरपीट उडाली.
उन्हातही पावसाच्या जोरदार सरी
सांगलीकरांना आज दुहेरी वातावरणाचा अनुभव घेतला. दुपारी उन्हामुळे सांगलीकर हैरान झाले असतानाच पावसाच्या सरीना सुरवात झाली. विश्रामबाग येथे भर उन्हातच जोरदार पावसाच्या सरी सुरू झाल्याने नागरिकांना या वातावरणाचा आनंद घेता आला.सांगलीत अनेक दिवसांपासून पारा 35 ते 40 डिग्री अंशावर असल्यामुळे तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या पावसाने नागरिकांना काही प्रमाणात थंडावा मिळाला. जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वारा झाला. त्यामुळे येथील झाडे वाऱ्यामुळे वाकली तसेच सुकी पाने गळून त्याचा खच पडलेला दिसत होता.
नाशिकमध्ये टँकरने पाणी पुरवठा सुरू
राज्यात काही ठिकाणी पावसाने सुरवात केली असली तरी नाशिक जिल्ह्यात मात्र उन्हाची तीव्रता अधिक वाढत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पाणी टंचाईच्या झळा बसत असून जवळपास एक लाख नागरिकांना 53 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे.माजी पालकमंत्री आमदार छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सर्वाधिक 43 गावांमध्ये 20 टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. तर, विद्यमान पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात देखील 9 टँकर सुरू आहे.
