पुणे :-
शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे हे भाजपच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. कोल्हे यांच्या देहबोलीवरून ते राष्ट्रवादीची साथ सोडणार असल्याचे संकेत मिळत आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे वैतागलेल्या खासदारांना कमळाने अलगदपणे गळाला लावले आहे. येत्या काही दिवसांत भाजपने राष्ट्रवादीतही फूट निर्माण केली जाणार अशी चर्चा आहे.
खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव-पाटील यांच्यातील वाद सर्वांनाच माहिती आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढळराव-पाटील यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न तडीस लावण्याबरोबरच धार्मिक कार्यक्रम हाती घेतले आहे. त्यातच राज्यातील सत्तांतर हे आढळराव पाटील यांच्या पत्त्यावर पडले आहे. कारण त्यांनी थेट शिवबंधन काढून शिंदे गटात सहभागी झाले आहेत. गती न मिळालेल्या प्रकल्पांनाही त्यांनी गती देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तर दुसरीकडे डॉ. कोल्हे हे मतदारसंघात हजर राहत नसल्यामुळे लोकांची, विशेष करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
काही दिवसांपूर्वी पोदेवाडी गावच्या विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी कोल्हे गैरहजर राहिल्याने माजी सरपंच अनिल वाळुंज यांनी सोशल मीडियावर (Social Media) नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे कोल्हे विरोधात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आवाज उचलला.
राष्ट्रवादी काँग्रेसला ठराविक अंतरावर ठेवण्याबरोबरच तिकडे कामांच्या माध्यमातून म्हणा किंवा चित्रपटाच्या निमित्ताने भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी डॉ. कोल्हेंची जवळीकता वाढल्याचे स्पष्टच झाले आहे. गेल्या आठवड्यात शिर्डीला राष्ट्रवादी काँग्रेसचे मंथन शिबिर झाले. त्यावेळी कोल्हे यांनी आजारी असल्याचे कारण सांगत शिबिराला गैरहजर होते.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. ज्या मतदारसंघात भाजपला यश मिळवता आले नाही, त्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. बारामतीमध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांचे दौरे सुरू आहेत, तर तिकडे डॉ. कोल्हेंची जवळीकता वाढल्याने शिरूर लोकसभेचाही सर्व्हे केला. तो एकदा नाही तर दोनदा. त्यामध्ये मात्र, मतदारसंघात खासदार डॉ. अमोल कोल्हेंनाच लोकांनी पसंती दिल्याचे भाजपच्या गोटातील नेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले
अमोल कोल्हे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यात टोकाचे मतभेद आहेत. आढळराव पाटील यांनी आगामी निवडणुकीत उतरण्यासाठी आतापासून जोरदार तयारी सुरू केली आहे. तिकडे भाजपच्या वरिष्ठ फळीतील नेत्यांशी कोल्हेंची गुफ्तगू सुरू आहे. शिरूरमधील कोल्हेंची कामे मार्गी लावण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. शिवाय दिल्ली दरबारीही कोल्हेंचे वजन वाढले गेले आहे. त्यामुळे काही दिवसांत कोल्हे भाजपमध्ये दाखल होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. मात्र त्या अगोदर भाजपकडून आढळरावांचे पुर्नवसन कसे करायचे, यावर खलबते सुरू झाले आहेत. त्यामुळे येत्या काळात कोल्हे-आढळरावांमध्ये दिलजमाई करण्यासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली सुरू झाल्याची चर्चा आहे.
