मुंबई :
मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रुममध्ये पुन्हा एकदा धमकीचा कॉल आला आहे. या कॉलवरून मुंबईतील प्रसिद्ध हाजीअली दर्ग्यावर हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे. हा धमकीचा कॉल उल्हासनगरमधून आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या कॉलनंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.हा धमकीचा कॉल 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास आला होता अशी माहिती आहे.
धमकीचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तातडीने दर्गा परिसरात धाव घेऊन दर्ग्यासह आजूबाजूच्या परिसराची तपासणी केली. यावेळी परिसरातील एल अँड टीच्या प्रकल्पस्थळाचीही तपासणी करण्यात आली. या धमकीच्या कॉलनंतर पोलिस पथकाव्यतिरिक्त बीडीडीएस आणि कॉन्व्हेंट व्हॅनही घटनास्थळी पाठवण्यात आली. मात्र घटनास्थळी काहीही आढळून आले नाही.
दरम्यान ज्या क्रमांकावरून पोलिसांनी धमकी आली त्यावर पुन्हा कॉल केल्यानंतर तो फोन बंद येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा कॉल नेमका कुणी केला आणि कुठून केला याचा पोलीस शोध घेत आहेत. या कॉलमध्ये किती तथ्य आहे आणि तो करणाऱ्याचा उद्देश काय आहे याचा देखील पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा कॉल उल्हासनगरमधून आला असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता फोन करणारी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे आणि तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती आतापर्यंतच्या तपासातून समोर आली आहे.
यापूर्वी 20 ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला दहशतवादी हल्ल्याची धमकी देण्यात आली होती. मुंबईचे पोलीस कमिशनर विवेक फणसळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री उशिरा मुंबईतील वाहतूक पोलिस नियंत्रणाला काही संदेश आले होते. यात उदयपूर आणि अमरावतीमधील घटनांचा संदर्भ घेऊन मुंबईत दहशत पसरवण्याबाबत धमक्या देण्यात आल्या होत्या.
