मुंबई :
वैद्यकीय शिक्षण हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून देण्यात येते. मात्र, मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हिंदीत सुरू केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात देखील वैद्यकीय शिक्षण मराठीत दिलं जाणार आहे.
वैद्यकीय शिक्षण क्षेत्राशी संबंधित एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. वैद्यकीय शिक्षण हिंदीतून करण्याचा मध्य प्रदेशसरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील आता मराठीतून वैद्यकीय शिक्षण घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबतची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेणं सोपं होणार आहे.
एमबीबीएससह या शाखांचा अभ्यासक्रम मराठीतून
मराठीत वैद्यकीय शिक्षणाचा हा निर्णय शैक्षणिक वर्ष 2023 पासून लागू होणार आहे. या अंतर्गत यापुढे एमबीबीएससह होमिओपॅथी, आयुर्वेद, दंतचिकित्सा, फिजिओथेरपी, नर्सिंग यासारखे अभ्यासक्रम मराठीत उपलब्ध होणार आहे. या निर्णयात विशेष बाब म्हणजे वैद्यकीयचे शिक्षण मराठीतून घेणे बंधनकारक राहणार नसून ते ऐच्छिक असेल. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे. याविषयी बोलताना, मध्य प्रदेशच्या निर्याणानंतर आता आपल्या राज्यात देखील मराठी भाषेत वैद्यकीय शिक्षण देण्याचा प्रयत्न आहे. त्यानुसार सर्वच पॅथी, एमबीबीएसपर्यंतचा अभ्यासक्रम हा मराठीतून असेल असे, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
समित्या नेमल्या
इंग्रजी भाषेबाबत विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड दिसून येतो. इंग्रजीच्या भीतीपोटी ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी वैद्यकीय शिक्षणापासून दूर पळतात. इंग्रजी भाषेबाबतचा न्यूनगंड लक्षात घेत वैद्यकीय शिक्षण मराठीतून करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शैक्षणिक वर्ष 2023 पासून हा निर्णय लागू होणार आहे. यासाठी विविध समित्या नेमल्या असल्याचे देखील महाजन यांनी सांगितले.
हिंदी अभ्यासक्रम देणारं मध्य प्रदेश पहिलं राज्य
वैद्यकीय शिक्षण हे प्रामुख्याने इंग्रजी भाषेतून देण्यात येते. मात्र, मध्यप्रदेश सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम हिंदीत सुरू केला आहे. याचा शुभारंभ भोपाळमध्ये करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ होत हिंदी अभ्यासक्रमाच्या पाठ्यपुस्तकाचे अनावरण करण्यात आले. याच पार्शवभूमीवर महाराष्ट्राने देखील राज्यात मराठीत वैद्यकीय शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे.
