पुणे :
राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी वेगळा गट तयार केला. शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना सध्या निवडणूक आयोगात सुरु आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? याचा निर्णय होणार आहे. निवडणूक आयोगात झालेल्या सुनावणीत अजित पवार यांच्यासंदर्भात भेकड शब्द शरद पवार गटाकडून वापरला गेला. त्यावर गुरुवारी सुनील तटकरे यांच्याकडून खंत व्यक्त करण्यात आली. आता सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे विरुद्ध अजित पवार मैदानात उतरणार आहे. अजित पवार यांनी लोकसभेच्या जागा लढवण्याची घोषणा केली. त्यात बारामती आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. यामुळे शरद पवार गटातील खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी असा सामना रंगणार आहे.

शिरुरमध्ये रंगणार सामना
शिरुरमध्ये शरद पवार गटाचे अमोल कोल्हे खासदार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघावर अजित पवार यांचे वर्चस्व आहे. अमोल कोल्हे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेचे शिवाजी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता. आता ही जागाही अजित पवार गट लढवणार आहे. यामुळे अमोल कोल्हे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे. अजित पवार या मतदार संघातून कोणाला उमदेवारी देणार? हे काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
