मुंबई :
शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिल्यानंतर अजित पवारांनी पहिल्यांदाच मनातील खदखद बोलून दाखवली आहे. त्यांनी आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का? असा थेट सवाल विचारत अप्रत्यक्षरित्या शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला.
आजपर्यंत लोकांसमोर मला व्हिलन केलं जातं आहे ते कळत नाही. आजही माझे श्रद्धास्थान शरद पवार आहे. शरद पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा पहिले दिला आणि नंतर मागे घेतला तेव्हा सुप्रियाला मी म्हणालो की, पवार साहेबांनी थांबावं तर ती म्हणाली ते हट्टी आहेत, ऐकणार नाही. शरद पवार आजही माझे आदर्श आहेत, मात्र माणूस वयाच्या साठीनंतर रिटायर होतो, मात्र माणसानं कधीतरी थांबावं..तरूणांना संधी कधी देणार..चुकलं तर तुम्ही आम्हाला दुरूस्त करा, कान धरा…मार्गदर्शन करा आता नवीन पिढी समोर येतेय. चुकलं तर अजित तुझं चुकलं असं सांगा, चूक मान्य करून दुरुस्त करून पुढं जाऊ. पण कोणासाठी चाललंय हे? असं चित्र का निर्माण केलं जात आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.
तुम्ही बोललात तर मला बोलावे लागेल : अजित पवार
आम्हीही पक्ष बांधला आम्हालाही लोक ऐकतात… आम्हीही नेते आहोत. जर आंबेगावात पवार साहेबांनी सभा घेतली तर मलाही प्रत्युत्तर म्हणून सात दिवसांनी सभा घ्यावी लागेल. असे म्हणत अजित पवारांनी थेट शरद पवारांना आव्हान दिले.
माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये : अजित पवार
एका आमदाराला शरद पवारा यांनी म्हटलं मला आमदार व्हायचं नाही तर ते म्हणाले की पाहतोच तू जिंकून कसा येतो? असं आपल्या कार्यकर्त्याला बोलतात का? परिवार आहे तो आपला. आज माझ्यावर जी वेळ आली आहे ती कुठल्याही परिवारावर येऊ नये. माझ्या कुठल्याही कार्यकर्त्याला जीवात जीव असेपर्यंत अंतर देणार नाही.
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी, बाकी कुणावरही बोला, बापाचा नाद करायचा नाही: सुप्रिया सुळे
लढणाऱ्या लेकीसाठी बाप बुलंद कहाणी… बाकी कुणावरही बोला पण बाप आणि आईचा नाद नाही करायचा असं खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना ठणकावलं. पक्षातल्या वडीलधाऱ्यांना सांगताय की तुमचं वय झालं, आता थांबा, अरे यांच्यापेक्षा आम्ही मुली बऱ्या, जेव्हा संघर्षाची वेळ येते तेव्हा तीच अहिल्या होते आणि ताराराणी होते असंही त्या म्हणाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या टीकेला उत्तर देताना खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, 2019 मध्ये 11 जागा राष्ट्रवादीच्या होत्या पण हा योद्धा लढला. राष्ट्रवादीचा आश्वासक चेहरा कोण? असा प्रश्न विचारल्यावर त्याचं उत्तर हे शरद पवार आहे. ही लढाई भाजपच्या विरोधात आहे. भाजप या देशातला सर्वांत भ्रष्टाचारी पक्ष आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, काही जणांमुळे माझं मन घट्ट झालंय. रतन टाटा अजूनही लढत आहे. आपल्यात फक्त जिद्द पाहिजे, वय फक्त क्रमांक आहे. 2019 मी विसरले नाही, ते विसरले असतील. मोदी यांनी राष्ट्रावादीने 70 हजार कोटींचा घोटाळा केला असे म्हटलंय. नरेंद्र मोदी हे आधी राष्ट्रवादीला नॅचरली करपट पार्टी म्हणायचे. आता त्यांनाच राष्ट्रवादीची गरज पडते. त्यामुळे या देशात सगळ्यात भ्रष्टाचारी पक्ष हा भाजप आहे.
पक्षचिन्ह जाऊ देणार नाही
पक्षाच्या ज्या नेत्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली असं सांगत शरद पवार म्हणाले की, काही सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेतली असली तरी काही केलं तरी पक्षाचं चिन्ह आणि पक्ष जाऊ देणार नाही. जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही असा टोला शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केला आहे.
शरद पवार म्हणाले की, हे सर्व घडत असताना छगन भुजबळ यांनी राजभवनवर काय सुरू आहे ते बघून येतो असं सांगितलं आणि तिकडे जाऊन शपथ घेतली. आज राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अनेक वेळा वेगळा विदर्भ केला पाहिजे असं भाष्य केलं आहे. पण आज काय झालं विदर्भाबाबत? त्यावर हे काहीही करत नाहीत. राज्याच्या इतिहासात असला मुख्यमंत्री पाहिला नाही असं त्यांनी अनेकदा त्यांच्या जुन्या भाषणात म्हटलं होतं. मग आता असल्या मुख्यमंत्र्यासोबत तुम्ही कसं काय बसता ?
