लोणी काळभोर :
कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराच्या खुनाचा कट पोलिसांनी उधळला आहे. खुनाच्या खटल्यातील साक्षीदाराची हत्या करायला निघालेल्या चौघांना पोलिसांनी पिस्तूल आणि घातक हत्यारासह ताब्यात घेऊन अटक केली आहे. लोणी काळभोर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. आशिष अनिल वरघडे, उद्धव राजाराम मिसाळ, सुरज सतीश जगताप आणि किशोर उर्फ शिवा छबु साळुंखे या कुख्यात गुंडांची नावं आहेत. उरुळी कांचन परिसरातील कुख्यात गुंड आप्पा लोंढे आणि वाळूमाफिया संतोष जगताप यांचा खून प्रकरणात आरोपी सध्या येरवडा कारागृहात आहेत. या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पवन मिसाळ हा सुद्धा येरवडा कारागृहात असून या गुन्ह्यांमध्ये साक्षीदार असलेल्या इसमाचा हत्या करण्याच्या इराद्याने मिसाळ याने चारही आरोपींना लाखोंची सुपारी दिली होती. हे चारही आरोपी पिस्तूल आणि घातक शस्त्र घेऊन फिर्यादीला गोळ्या घालवण्यासाठी जात असताना पोलिसांनी अटक केली.
पिस्तूल आणि घातक हत्यारासह ताब्यात
कुख्यात गुंड आप्पा लोंढे वाळू माफिया संतोष जगताप यांच्या हत्या प्रकरणातील साक्षीदाराची हत्या करण्यासाठी आरोपी निघाले होते. त्यावेळी लोणी काळभोर पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्यांनी त्याचवेळी चार जणांना ताब्यात घेत खुनाचा कट उधळला. त्यावेळी त्या आरोपींजवळ पिस्टल आणि घातक हत्यारं होती. पोलिसांनी ती हत्यारं जप्त केली आहे आणि चारही जणांना अटक केली आहे.
काय आहे प्रकरण?
आप्पा लोंढे याचं पुण्यातील अनेक जणांशी वैर होतं. वाळूमाफिया, राजकीय वाद असल्याने अनेकांंशी त्यांचे वाद व्हायचे. तो राजकारणात प्रवेश करण्याच्या तयारीत होता. अनेकांच्या हत्या प्रकरणात तो आरोपी होता. त्यासोबतच त्याची पुणे आणि जवळच्या इतर परिसरात मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे पुर्ववैमनस्यातून आप्पाच्या हत्येचा कट रचण्यात आला होता. त्यानुसार 28 मे 2015 मध्ये आरोपींनी आप्पा लोंढे याला उरुळीकांचन जवळील शिंदवणे रस्त्यावर थांबवून गोळ्या घालून त्याची हत्या केली होती. या प्रकरणी आरोपी संतोष मिनराव शिंदे, निलेश खंडू सोलनकर, राजेंद्र विजय गायकवाड, आकाश सुनिल महाडिक, विष्णू यशवंत जाधव, आणि नागेश लखन झाडकर यांना त्यावेळी जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली होती.