प्रजासत्ताक दिनानिमित्त खास आकर्षण
– प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर साडेतीन शक्तिपीठांच्या देखाव्याचं सादरीकरण, ‘साडेतीन शक्तिपीठं आणि स्त्रीशक्ती जागर’ संकल्पनेवर आधारित महाराष्ट्राच्या चित्ररथानं जिंकली सगळ्यांचीच मनं.
– प्रजासत्ताक दिनानिमित्ताने कर्तव्यपथावर नारी शक्तीचं दर्शन…बीएसएफच्या महिला उंट सवार टीमसह विविध राज्यांच्या चित्ररथांनीही केला स्त्री-शक्तीचा जागर
– कर्तव्य पथावरच्या परेडमध्ये इजिप्तच्या सैनिकांच्या तुकडीचाही समावेश. 144 सैनिकांचं संचलन, कर्नल महमूद मोहम्मद अब्देल फत्ताह एल खारासावी यांनी केलं तुकडीचं नेतृत्त्व..
– काश्मीरच्या लालचौकातही फडकवला तिरंगा. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमध्ये कडेकोट बंदोबस्त..
– 74 व्या प्रजासत्ताक दिनी कर्तव्यपथावर देशाच्या लष्करी सामर्थ्याचं दर्शन…४४ विमानांचा फ्लायपास्ट

74 वा प्रजासत्ताक दिनात भारतीय सैन्यदलाची दिसली ताकद
देश आज अत्यंत उत्साहात 74 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. सालाबादप्रमाणे कर्तव्य पथवर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सैन्यदलांनी मानवंदना दिली. तत्पूर्वी पंतप्रधान मोदींनी सकाळी राष्ट्रीय युद्धस्मारकावर शहिदांना मानवंदना दिली. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी होते. इजिप्तच्या सैन्यदलांनी शानदार संचलन करत उपस्थितांची मनं जिंकली.
प्रजासत्ताक दिन सोहळ्यात प्रथमच परदेशी सैन्यदलांचं पथक सहभागी झालं. संचलनाची सुरुवात मेकनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटने केली. भारतीय सैन्यदलाचे विविध रणगाडे, चिलखती वाहनं, के 9वज्र सारख्या तोफा, आकाश सरफेस टू एअर मिसाईल सिस्टीम सहभागी झाले. लष्कराच्या इन्फन्ट्री रेजिमेंटच्या पंजाब, मराठा लाईट इन्फन्ट्री, बिहार या रेजिमेंट, वाय़ुदल, नौदलाच्या पथकांनी शानदार संचलन केलं.
संपूर्ण सोहळ्यात मेड इन इंडिया हा मंत्र होता. संपूर्ण सोहळ्यात केवळ भारतीय बनावटीची शस्त्रास्त्र सादर करण्यात आली. यावर्षी संपूर्ण सोहळ्यावर नारीशक्तीचा प्रभाव होता. वायुदल, नौदलाच्या पथकांचं प्रमुखपद महिला अधिका-यांकडे होतं. सीआरपीएफचं संपर्ण महिलांचं पथक होतं. तर दिल्ली पोलिसांचं संपूर्ण महिलांचं बँड पथक होतं. विविध राज्याच्या चित्ररथाद्वारेही महिलाशक्तीचा जागर करण्यात आला.

विविध राज्यांच्या रथांचे संचलन
74व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या झांकीमध्ये ‘नारी शक्ती’चा रथ आकर्षण ठरला होता. तर हरियाणाची झांकी भगवद्गीतेवर आधारित रथ साकारण्यात आला होता. महाभारताच्या युद्धातील विविध दृश्ये दाखवण्यात आलीत.
कर्तव्य पथावर देशाचा तिरंगा फडकवला
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्य पथावर तिरंगा फडकवण्यात आला. प्रथमच देशी बनावटीच्या 105 फील्ड गनमधून सलामी देण्यात आली. पंतप्रधान मोदींनी शहीद जवानांना अभिवादन केले. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम सुरु होण्यापूर्वी पंतप्रधान मोदी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचले. पंतप्रधान मोदींनी येथे शहीद जवानांना अभिवादन केले.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन
74 व्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. कर्तव्य पथवर भारताच्या सामर्थ्याचं शानदार संचलन करण्यात आले. देशभरात प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे.यावर्षी प्रजासत्ताक दिन सोहळ्याची थिम जन भागीदारी अशी ठरवण्यात आली आहे. इजिप्तचे राष्ट्रपती अब्देल फताह अल सिसी हे यावर्षीच्या सोहळ्याचे प्रमुख अतिथी आहेत. काल त्यांचं भारतात आगमन झालं. प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सैन्यदलांचं संचलन… सकाळी 10 वाजता नवी दिल्लीतल्या विजय चौकातून हे संचलन सुरू झाले. यावर्षी प्रथमच इजिप्त सैन्यदलांचं संयुक्त पथक प्रजासत्ताक दिन सोहळ्यात संचलन करत आहे.
