अहमदनगर :
प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सासू शशिकला शिवाजी पवार यांनी आज अखेर भाजपात प्रवेश केलाय. राज्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शशिकला यांनी भाग घेतला होता. विशेष म्हणजे या निवडणुकीत शशिकला यांची सरपंचपदी निवड झाली होती. सरपंचपदाची निवडणूक जिंकल्यानंतर शशिकला पवार कोणत्या पक्षात जाणार? याबाबतच्या चर्चांना उधाण आलं होतं. शशिकला अपक्ष उमेदवार होत्या. पण आज त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.
शशिकला पवार यांनी ग्रामपंचायत निवडणूक जिंकल्यानंतर प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळीच त्यांनी आपण भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत जाऊ असं स्पष्ट केलं होतं.बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे पाटील हे या जिल्ह्यातील नेते आहेत. गावाच्या विकासासाठी आम्ही विखे पाटलांकडं जाऊ शकतो. कारण गावाचा विकास महत्त्वाचा आहे, असं शशिकला पवार यांनी सांगितलं होतं. शशिकला यांच्या त्या विधानानंतर आज त्यांनी भाजपात प्रवेश केल्याचं स्पष्ट झालं.
“मी कीर्तनही करते. माझ्या चार वाऱ्या असतात. पंढरपूर, आळंदी, पैठण आणि त्र्यंबकेश्वर. या चारही वाऱ्यांत दोघेही नवरा-बायको पायी असतो. सर्वसामान्य जनतेत आम्ही पायी वारी करतो. आम्ही पंढरपूरचे वारकरी आहोत. पांडुरंगाची लेकरं आहोत”, असं शशिकला पवार म्हणाल्या होत्या.“हिवरेबाजारचे पोपटराव पवार आणि राळेगणसिद्धी या गावांबद्दल खूप माहिती मिळाली. तिथले लोकं खूप समाधानी वाटायचे. आपण जर असं काम केलं, तर चार पिढ्या नाव घेतील. काम मिळालं तर आपणही करू शकतो”, असं शशिकला पवार म्हणाल्या होत्या.
