निफाड :
भारतीय सैन्य दलामध्ये भरती झालेल्या महाराष्ट्राच्या सुपुत्रीला वीरमरण आल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातील गायत्री जाधवला सैन्य दलामध्ये कार्यरत असताना वीरमरण आलं आहे. गायत्री ही फक्त 23 वर्षांची होती. प्रशिक्षण घेत असताना गायत्रीच्या डोक्याला मार लागला होता. डोक्याला दुखापत झालेल्या गायत्रीवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. पण उपचार घेत असतानाच तिने अखेरचा श्वास घेतला. गायत्रीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसंच तिच्या मृत्यूमुळे निफाड तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहीद गायत्री भारतीय सैन्य दलामध्येची निवड झाल्यानंतर ती बिहारच्या अररिया जिल्ह्यातील बथनाहा येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होती. पण राजस्थानमधील अलवर येथे प्रशिक्षण घेत असताना गायत्री खड्ड्यात पडली आणि तिच्या डोक्याला दुखापत झाली. जखमी झालेल्या गायत्रीवर जयपूर येथे शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर ती पुन्हा प्रशिक्षणसाठी रुजू झाली. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर गायत्री बिहारच्या बथनाहा इथे कर्तव्यावर रुजू झाली. मात्र त्याठिकाणी तिला त्रास जाणवू लागल्याने ती सुट्टी घेऊन निफाड येथील आपल्या घरी आली.
मुंबई आणि नाशिक दोन्ही ठिकाणी गायत्रीने उपचार घेतले. पण उपचार घेऊनही तिच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा होत नसल्याने तिला कुटुंबीय दिल्लीला घेऊन जाणार होते. मात्र त्याआधीच गायत्रीचा मृत्यू झाला. गायत्रीच्या घरची परिस्थिती हालाखिची असून तिला चार बहिणी आहेत. इतक्या लहान वयामध्ये गायत्रीचा मृत्यू झाल्यामुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
