नाशिक :-
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावित यांचं वयाच्या 88 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. त्यांच्यावर रविवारी नवापूरमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्या कार्याचा एक वेगळा ठसा उमटवला. त्यांनी प्रदीर्घ काळ आदिवासी समाजाचे नेतृत्व केले. त्यांच्या जाण्याने आदिवासी समाजाचं नेतृत्व हरपल्याची भावना आहे. त्यांच्या निधनाने मोठी पोकळी निर्माण झाली आहे. माणिकराव गावित यांच्या पश्चात तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. माणिकराव गावित हे काँग्रेसकडून अनेकदा लोकसभेवर निवडून आले होते. गावित यांच्या निधनाने काँग्रेसचा मार्गदर्शक नेता हरपला आहे.
दिरा गांधी आणि नंदूरबार
निवडणुकीच्या काळात इंदिरा गांधी विविध नवनवी धोरणं अंमलात आणायच्या. पण एक परिपाठ त्यांनी कधी बदलला नाही. तो म्हणजे निवडणूक प्रचाराची सुरुवात. इंदिरा गांधी कायम नंदूरबार जिल्ह्यातून निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायच्या. ते त्यांनी कायम ठेवलं.
सोनियांची पहिली सभा
सोनिया गांधी आणि नंदूरबारचंही विशेष नातं आहे. सोनिया गांधी यांची पहिली सभा याच नंदूरबारमध्ये झाली. त्यांच्या राजकीय प्रवेशाआधी त्यांनी नंदूरबारमध्ये सभा घेतली होती.
गावितांचं नंदूरबार
माणिकराव गावित यांचा नंदूरबारच्या राजकारणावर कायम दबदबा राहिला. त्यांनी 9 टर्म नंदूरबारचे खासदार राहिले. दोन वेळा केंद्रात राज्यमंत्री, लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. आदिवासी समाजाचे प्रश्न, त्यांच्या समस्या त्यांनी संसदेत मांडल्या. तसंच त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते कायम कटिबद्ध राहिले.
गावितांचं निधन
माणिकराव गावित यांचं निधन झालंय. ते मागच्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर नाशिकमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 88 वर्षांचे होते. उद्या (रविवार) नवापूर इथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
