मुंबईतील नागपाडा परिसरात गणपतीचा मंडप उभारण्यावरुन एका महिलेला मारहाण करण्यात आल्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी तिन्ही मनसे कार्यकर्त्यांना अटक केली आहे. नागपाडा पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजमनातून संताप व्यक्त केला जात होता.

पोलिसांनी सांगितले की, आरोपी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी बॅनर लावण्यासाठी पीडित महिलेच्या दुकानासमोर बांबू लावत होता. त्याला पीडित महिलेने विरोध केला. त्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी पीडित महिलेशी धक्काबुक्की केली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी स्वत: महिलेशी संपर्क साधला आणि पोलिस ठाण्यात तिचा जबाब नोंदवून गुन्हा दाखल केला. आरोपी विनोद अरगिळे, राजू अरगिळे, संदीप लाड यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही घटना दोन दिवसांपूर्वीची आहे. मुंबईतील मुंबादेवी परिसरात एका ठिकाणी गणपतीचा मंडप उभारला जात होता. त्याच ठिकाणी बॅनर लावण्यासाठी आजूबाजूच्या दुकानांच्या समोर बांबू लावले जात होते. तेथील एका मेडिकल शॉपसमोर काही मनसे पदाधिकारी बांबू लावत होते. त्यावेळी व्हिडीओमध्ये दिसत असलेली महिला. महिलेने त्यांना ते बांबू लावण्यास विरोध केला. त्यावेळी मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे याच्याकडून महिलेला मारहाण करण्यात आली.

 

मारहाण करणाऱ्या व्यक्तिनं काय म्हटलं…

मनसे उपविभाग प्रमुख विनोद अरगिळे यानं बोलताना म्हटलं की, या व्हिडीओमध्ये फक्त एकच बाजू दिसतेय. ती महिला आमच्या अंगावर धावून आली. त्यानंतर तिनं अर्वाच भाषेत शिवीगाळही केली. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच यापूर्वीही त्या महिलेविरोधात तक्रार केल्याचं मनसे पदाधिकाऱ्यानं सांगितलं. तसेच, महिलेनं आमच्या अंगावर येऊन आमची कॉलर धरणं हे कोणत्या संस्कृतीत बसतं. तिनं आमच्या अंगावर धावून आली म्हणजे, आम्ही आमच्या बचावासाठी काहीच करायचं नाही का? आम्ही महिलांचा आदर करणं गरजेचं आहेच. पण त्यांनीही आमचा आदर राखणं गरजेचं आहे, असंही मनसे पदाधिकाऱ्यानं म्हटलं आहे.

त्या राज ठाकरे यांच्याबद्दल उलटसुलट बोलत होत्या. त्या माझ्या अंगावर आल्या, त्यामुळं माझ्याकडून हे कृत्य घडलं. त्याबद्दल मी त्यांची जाहीर माफी मागायला तयार आहे. माझ्यावर जी कारवाई होईल त्यासाठी मी तयार आहे, असंही मनसे विभागप्रमुख विनोद अरगिळेनं म्हटलं आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!