आळेफाटा :
कायद्याने मटक्यावर बंदी असतानाही जुन्नर तालुक्यातील आळेफाटा आणि बेल्हे परिसरात मटक्याबरोबरच जुगार अड्डे देखील जोरात सुरू आहेत. विशेष म्हणजे हे सर्व अवैध धंदे पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर सुरू आहेत. सर्वसामान्य नागरिकांवर कायद्याचा धाक निर्माण करणारे पोलीस मात्र या अवैध धंद्याकडे डोळेझाक करत आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागत असून गोरगरीबांच्या खिशातले पैसे मटका व जुगार अड्डे चालवणार्यांकडून ओरबाडले जात असल्याने सर्वसामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहे.
आळेफाटा,बेल्हा आणि परिसरात मटक्याप्रमाणेच पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावांमध्ये खुले आमपणे वर्दळीच्या ठिकाणी जुगार सुरु आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, महिला व शालेय विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पण हा सगळा प्रकार पोलिसांच्या नाकासमोर सुरु असताना ते नेमका कानाडोळा का करतात ? याबाबत स्थानिक नागरिकांमध्ये हप्ते घेऊन संरक्षण देण्यात पोलीस मश्गुल असल्याची जोरदार चर्चा आहे. तर पोलिसांचे संरक्षण असल्यामुळे हे अवैध धंदे सुरू असल्याचा गंभीर आरोप आता नागरिक करु लागले आहेत.
अनेक तरुण बिंगो चक्री, जुगार, मटका आदींमध्ये मोठ्या प्रमाणात पैसा हरतात. पर्यायाने नैराश्याकडे झुकलेला हा तरुण व्यसनाच्या आहारी जात आहे. त्यातून अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. याबाबत नागरिकांनी स्थानिक पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या. मात्र पोलीस व अवैध व्यावसायिकांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने पोलिसांकडून कारवाई होत नाही.
त्यामुळे मटका व जुगार अड्ड्यावर कारवाई करुन पोलीस नागरीकांमध्ये सुरू असलेल्या या चर्चांना पूर्णविराम देणार का ? याकडे आता लक्ष लागले आहे. दरम्यान, दोन ते तीन महिन्यातून एकदा पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हे खासगी वाहनाने बेल्हे येथील मटका पिढ्या सुरू असलेल्या ठिकाणी येतात अशी चर्चा आहे.