खालापूर  :

इर्शाळगडाजवळ डोंगराजवळील एका गावावर काल रात्री दरड कोसळली. या दरडीखाली 50 ते 60 घरे दबली आहेत. चौक गावापासून 6 किमी डोंगर भागात मोरबे धरणाच्या वरच्या भागात आदिवासी वाडी आहे. दरड या रहिवासी घरांवर कोसळली आहे. आदिवासी ठाकूर समाजाची घरे आहेत. रात्री अख्खं गाव झोपलेलं असताना अचानकपणे डोंगराचा काही भाग कोसळला आणि यात 200-250 लोकसंख्या असलेलं गाव मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलं गेलं.

लोकांना कोणताही त्रास होऊ नये आणि संपूर्ण माहिती मिळावी म्हणून प्रशासनाने हेल्पलाइन नंबर जारी केला आहे. 8108195554 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे

घटनेची माहिती मिळताच NDRF ची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. त्यांच्याकडून बचाव कार्याला सुरूवात झाली आहे. मात्र इर्शाळगड हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं आहे. इर्शाळगडाच्या पायथ्याशी हे गाव आहे.या गावात जाण्यासाठी केवळ पायवाट आहे. त्यामुळे तिथे यंत्रणा पोहोचण्यास अडचणी येत आहेत. जेसीबी. पोकलेन यासारखी वाहणं तिथं पोहचू शकत नाहीयेत. त्यामुळे कुदळ, फावड्याच्या सहाय्याने NDRF कडून बचावकार्य केलं जात आहे. स्थानिकही या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत.

दरम्यान इर्शाळगडावरील काही हृदयद्रावक दृश्य समोर येतायत. कुणाची आई, कुणाची बहीण, कुणाचे वडील या घटनेत जखमी झालेत. काहींचा शोध लागत नाहीये तर काही दगावलेत.घटनेची माहिती मिळताच स्थानिक लोकं आणि नातेवाईक इथे जमा झालेत. नातेवाईकांनी इथे अक्षरशः टाहो फोडलाय.लोकं इथे मदतकार्यासाठी पायवाटेने जात आहेत. बरीच घटनास्थळी थांबून आपला माणूस सापडतोय का याची वाट बघत आहेत.

34 जणांना वाचवले

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इरशाळगडाच्या पायथ्याशी मोठी दुर्घटना घडली आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 100 हून अधिक लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री घडलेल्या या दुर्घटनेनंतर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत एकूण 34 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत.

मदतकार्य सुरू

अंधार आणि पाऊसही असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे येत असल्याने बचावकार्य काही वेळासाठी थांबवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असून अडकलेल्या इतर लोकांना बाहेर काढण्यात येत आहे.

मात्र, अत्यंत चिंचोळा भाग आणि उंच टेकडीवर गाव असल्याने वर पोकलेन किंवा जेसीबी जाऊ शकत नाही. त्यामुळे कुदळ, फावडं आणि खोऱ्याच्या सहाय्याने मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. तसेच हेलिकॉप्टरच्या सहाय्यानेही मदत करण्यात येणार आहे. मात्र, खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरद्वारे किती मदत होईल यावर शंका व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री फिल्डवर, उपमुख्यमंत्री नियंत्रण कक्षात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गिरीश महाजन आदी नेते मंडळी घटनास्थळी पोहोचले आहेत. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्रालयातील आपत्कालिन नियंत्रण कक्षात पोहचले आहेत. अजित पवार हे नियंत्रण कक्षातून खालापूरनजीक इरशालगड परिसरात गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील नागरिकांच्या बचाव आणि मदतकार्याचं संनियंत्रण करीत आहेत.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!