धक्कादायक ! केरळमध्ये बोट उलटून 21 पर्यटकांचा मृत्यू
केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात रविवारी पर्यटकांची बोट उलटून 21 जणांचा मृत्यू झाला. प्राप्त माहीतीनुसार, बोटीमध्ये 40 पेक्षा अधिक जण होते. केरळचे क्रीडा मंत्री व्ही अब्दुर रहमान यांनी वेगवेगळ्या रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे 20 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितले की, मृतांमध्ये बहुतेक मुले आणि महिला आहेत. 4 जणांना गंभीर अवस्थेत कोट्टाक्कल रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पैलवानांकडून अल्टिमेटम , मोठे आंदोलन होणार ?
भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेच्या मागणीवरून धरणे आंदोलनाच्या 15व्या दिवशी मोठी घोषणा करण्यात आली. जंतर-मंतरवर रविवारी देशभरातील खापची महापंचायत झाली. साडेचार तास चाललेल्या महापंचायतीत बृजभूषण यांना अटक करावी, यासाठी सरकारला 15 दिवसांची मुदत देण्यात आली. यावेळी सायंकाळी कँडल मार्चदेखील काढण्यात आला होता.
गुगलच्या पुढाकाराने होणार लाॅग इन करणे सोपे !
प्रसिद्ध टेक कंपनी गुगलच्या सर्व प्लॅटफाॅर्मचे अकाऊंट आता पास-कीने सुरू होऊ शकतात, असे तगडे फिचर गुगलने आणले असून त्यानुसार पास-की पासवर्डची जागा घेईल. यासोबतच फिंगर प्रिंट, फेस स्कॅन किंवा स्क्रिन लाॅक पिनचा वापर करून तुम्ही ॲप्स वापरू शकतात. ॲपल आणि मायक्राेसाॅफ्ट कंपनी पास-की तंत्रज्ञानावर काम करत आहेत. ही टेक्नॉलॉजी येत्या वर्षभरात वापरकर्त्यांना वापरता येऊ शकते. तसेच फिशिंग, सिम स्वॅपद्वारे होणाऱ्या फसवणुकीलादेखील आळा बसू शकतो आणि पासवर्डची चाेरी टळली जाऊ शकते. यामध्ये टू स्टेप व्हेरिफिकेशनने अधिक सुरक्षितता मिळून त्यात बायाेमेट्रिकचा वापर करून स्वतंत्र डिव्हाइसमध्ये स्वतंत्र पास-की ठेवता येणार असल्याची माहीती आहे, जी पास-की क्लाउडमध्ये स्टाेअर हाेईल.
