पुणे :

मागील काही दिवसांपासून  स्पा सेंटर चालवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे.  त्यातच पुण्यातील पंचतारांकित हॉटेलमध्ये  सुरु असलेल्या वेश्याव्यवसायावर पुणे पोलिसांनी छापा टाकला आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने हा प्रकार उघडकीस आणून कडक कारवाई केली आहे. या कारवाईत पुणे स्टेशन परिसरातील हॉटेलमधून 3 दलालांना अटक केली आहे.

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईत दिल्ली, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालमधील चार तरुणींना ताब्यात घेतलं आहे. रवींद्रकुमार तुलशी यादव, आनंदकुमार सुक्कर यादव, अभिषेक प्रकाशचंद बेनिवाल अशी अटक केलेल्या दलालांची नावे आहेत. हे दलाल सोशल मीडियावरून ग्राहकांच्या संपर्कात होते. पुणे स्टेशन परिसरातील फाईव्ह स्टार हॉटेलमधील खोली बुक करून परराज्यातील तरुणींना तिथे बोलावून घेत. त्यानंतर ग्राहकांशी ऑनलाईन पद्धतीने संपर्क साधून आर्थिक व्यवहार करत होते.

पोलिसांच्या पथकाने तिथे छापा टाकून दोन तरुणींना ताब्यात घेतले. त्यांच्या चौकशीअंती येरवडा भागात आणखी दोन तरुणी आणि तीन दलाल थांबल्याची माहिती मिळाली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात दलालांच्या विरुद्ध अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन दिवसांपूर्वी हडपसरमधील अशाच प्रकारच्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. देहविक्रीसाठी आणलेल्या पीडित महिलांची त्या ठिकाणाहून सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कॉन्स्टेबल रंजना पिसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी मारुती महादेव जाधव, कृष्णा दिनकर जाधव रमेश ढोरे, परमेश्वर काळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हरपळे वस्तीतील ढोरे पेट्रोल पंपासमोरील स्वर्ग लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू होता. या ठिकाणाहून नवी मुंबईतील 37 वर्षीय महिला आणि पश्चिम बंगालमधील 27 वर्षीय महिलेची सुटका करण्यात आली होती. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फुरसुंगी रोडवरील एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या लॉजवर छापा टाकून दोन महिलांची सुटका करण्यात आली होती.

अवैध धंद्यावर पोलिसांची करडी नजर

पुण्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. त्यात अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. याच सगळ्या अवैध धंद्यांना आळा घालण्याचं पुणे पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. त्यासोबतच बाकी गुन्ह्याच्या संख्येत देखील वाढ झाल्याचं मागील काही दिवसात घडत असलेल्या घडनांमुळे समोर आलं आहे.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!