पुणे :
पिंपरी चिंचवडमध्ये आज महिला दिनाच्या निमित्ताने लावणीच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात डान्सर गौतमी पाटील हिला पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. गौतमीसोबत गेल्या आठवड्यात एक विकृत आणि विक्षिप्त प्रकार घडला. त्या प्रकाराआधी तिची सोशल मीडियावर निगेटिव्ह पब्लिसिटी करण्यात येत होती. गौतमीने माफी मागितल्यानंतरही तिचे जुने व्हिडीओ पोस्ट करुन टीका केली जात होती. तसेच तिची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात होता. या दरम्यानच्या काळात गौतमीच्या विरोधकांनी परिसिमा गाठली. त्यांनी गौतमीला नकळत एक व्हिडीओ बनवला आणि संबंधित आक्षेपार्ह व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. या प्रकारानंतर आता गौतमीदेखील आक्रमक झालीय.
गौतमी पाटीलवर वारंवार आक्षेपार्हतेचा ठपका ठेवून टीका केली जाते. त्याच मुद्द्यावर गौतमीने आज भूमिका मांडली. “झालेल्या गोष्टींवर अनेकदा माफी मागितली. एकदा, दोनदा नव्हे तीनदा माफी मागितली. समोरच्या व्यक्तीला आता समजलं पाहिजे, हिने माफी मागितली आहे. माफी तरी कितीदा मागायची? आता यापुढे मी कोणाचं ऐकून घेणार नाही”, असं गौतमी पाटील म्हणाली. “मला अजून बरेच जण म्हणतात हीचं अश्लील नृत्य असतं. महिलांसमोर मी डान्स केला. हा डान्स अश्लील होता का? हे तुम्हीच सांगा मी तर सांगून सांगून थकले आहे”, असंही ती म्हणाली.
गौतमी पाटील नेमकं काय म्हणाली?
“मी बरेच कार्यक्रत करते. माझ्या कार्यक्रमात महिलांच्या तुलनेत पुरुषांची संख्या जास्त असते. मी आज जे काही प्रेम पाहिलं ते बघून खूप छान वाटलं. आज फक्त पुरुषच नाही तर महिलांचं देखील माझ्या नृत्यावर तितकंच प्रेम आहे. माझा आज हा पहिलाच पुरस्कार होता. त्यामुळे ‘आपला आवाज आपली सखी’ यांचं आभार मानते. महिला वर्गाचं लावणीचं प्रेम बघून खूप छान वाटलं”, असं गौतमीने सांगितलं.