धाराशीव :
ठाकरे गटातील दोन खासदारांनी प्रतिज्ञापत्र दिले नसल्याचं समोर आल्यामुळे शिंदे गटाच्या बाजूनं असलेले ते दोन खासदार कोण असा प्रश्न सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात पडला आहे. त्यातच एकनाथ शिंदेंच्या जवळचे मंत्री तानाजी सावंत आणि ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर एकत्र आल्याने सर्वत्र विविध चर्चांना उधाण आलं आहे. तानाजी सावंत आणि ओमराजे यांच्यात काही काळापासून वितुष्ट आलं होतं. मात्र आता एकमेकांचे शत्रू असलेले दोघेही एकाच कार्यक्रमात आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
एवढेच नव्हे तर तानाजी सावंत यांनी ठाकरे गटाचे खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील यांच्या खांद्यावर हात ठेवून एकप्रकारे एकनाथ शिंदे पाठीशी असल्याचे संकेत दिले. धाराशीवमधून दोन लोकप्रतिनिधींनी ठाकरेंची साथ सोडणे हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का आहे. तर लोकसभेत आणखी एक खासदार शिंदे गटात पाहायला मिळणार आहे. तर विधानसभेत कैलास पाटील यांच्या रूपानं 51वा आमदार शिंदेंकडे आल्याचे दिसेल.
आमदार कैलास पाटील हे तर गुजरातमधून शिंदेची साथ सोडून परत आल्यामुळे उद्धव ठाकरेंच्या गळ्यातील ताईत झाले होते. पण आता तानाजी सावंत यांच्यासोबत दिलजमाई झाल्यामुळे धाराशीवमधून ठाकरेंच्या पाठीशी राहणारे दोन कट्टर लोकप्रतिनिधी आता शिंदेसोबत जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
धाराशीव येथे शिवजयंतीनिमित्त दोन राजकीय वैरी एकमेकांच्या हातात हात घालून व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहायला मिळाले. शिंदे गटानं शिवसेनेतून उठाव केल्यानंतर धाराशीवचे खासदार ओमराजे आणि आमदार कैलास पाटील या दोघांनीही ठाकरे गटात राहणे पसंत केलं. पण आता पक्षाचं चिन्ह आणि नाव शिंदेंना मिळाल्यानंतर ओमराजे आणि कैलास पाटील यांची निष्ठाही बदलल्याचे दिसतंय. शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त तिघेही एकत्र आले होते.
दुसरीकडे, ओमराजे आणि कैलास पाटील यांचे भाजप आमदार राणा जगजीत सिंग यांच्याशी वाद आहे. तर तानाजी सावंत यांनी भाजप आमदार राणा जगजीत सिंग आणि त्यांचे वडील पद्मसिंह पाटील यांच्या विरोधातदेखील जोरदार टीका केली होती. त्यामुळे धाराशीवमध्ये भाजप विरूद्ध शिंदे असं चित्र निर्माण होत आहे.