पुणेः

कोर्टात जात असताना कार्यरत असलेले पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाये माणुसकी दाखवत पुणेकरांचा मन जिंकलं आहे. ७२ वर्षांचे जेष्ठ नागरिक बबनराव भाऊसाहेब डोंगरे हे पुणे महापालिकेच्या रस्त्याने पायी जात असताना त्यांना अचानक चक्कर आल्याने ते रस्त्यावरच कोसळले त्यांना डोक्याला मार लागल्याने बेशुद्ध पडले, रक्त येऊ लागले. यामध्ये बघ्याची गर्दी ही जमली. मात्र, कोणीही हात लावायला तयार नव्हते. दरम्यान, याचवेळी तेथून कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये यांनी गर्दीत जाऊन त्या वृद्धावर प्राथमिक उपचार करून तत्काळ आजोबांना दवाखान्यात दाखल केले. त्यांच्या या माणूसकीची पुण्यात चर्चा आहे.

ज्येष्ठ नागरिक डोंगरे हे मूळचे फुगेवाडी भोसरी येथील राहणारे. ते खडकी येथील दारूगोळा कारखान्यातून सेवानिवृत्त झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी ते कामानिमित्त महापालिकेच्या परिसरात आले होते. तेथून रस्त्याने पायी चालत जात असताना अचानक त्यांच्या भोवळ आली आणि ते रस्त्यावरच बेशुद्ध होऊन कोसळले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने रक्त येऊ लागले. त्यामुळे नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. परंतु कोणी पुढे येईना.

त्याचवेळी त्यांचे नशीब बलवत्तर म्हणून तेथून रिक्षातून कोर्टात रिमांडसाठी निघालेले पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाये थांबले. त्यांनी गर्दीत जाऊन पाहिले तेव्हा ज्येष्ठ नागरिक रस्त्यावर बेशुद्ध पडलेले दिसले. क्षणाचाही विलंब न करता, जायभाये यांनी प्राथमिक उपचार करून त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. थोडीशी शुद्ध आल्यानंतर जायभाये यांनी त्यांना त्याच रिक्षातून स्वतः ससून रुग्णालयात दाखल केले.

डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. काही वेळानंतर ज्येष्ठ नागरिक शुद्धीवर आले. शुद्धीवर येईपर्यंत जायभाये रुग्णालयातच थांबून होते. ज्येष्ठांच्या घरी संपर्क साधून त्यांच्या मुलांना ससून रुग्णालयात बोलावून घेतले नंतरच आपल्या कर्तव्यावर रवाना झाले.

Hindavi News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!