पुणे :
राज्य उत्पादन शुल्क विभागाने पुण्यात मोठी कारवाई केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तब्बल 1 कोटी 70 लाख रुपयाची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी 7 जणांना अटक केली असून त्यांच्या जवळील मुद्देमालासह एक चार चाकी गाडी देखील जप्त केली आहे.
थर्टी फर्स्ट सेलिब्रेशनच्या तोंडावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 2000 हून अधिक दारूचे बॉक्स जप्त करण्यात आले आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुण्यातील नवले ब्रीज आणि तळेगाव दाभाडे या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे. 7 आरोपींमधील काही जणांवर या आधी देखील अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी गुन्हा दाखल आहे. या दोन्ही ट्रकमधून दारू गोव्यातून निघून पुण्यासह गुजरात, कर्नाटक, राजस्थान या ठिकाणी जात होती.
ट्रकमध्ये पसरवल्या डांबराच्या गोळ्या
या कारवाईत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना या प्रकाराचा संशय येऊ नये म्हणून आरोपींनी शक्कल लढवली होती. त्यांनी ट्रकभर डांबराच्या गोळ्या पसरवून ठेवल्या होत्या. मद्य साठ्यातील एखादी बॉटल फुटली किंवा लिक झाली तर वास येण्याची शक्यता असते त्यामुळे आरोपींनी संशय येऊ नये म्हणून त्यांनी हे कृत्य केलं होतं. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने शिताफीने 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ही मोठी कारवाई केली आहे.
पोलिसांची करडी नजर
नवीन वर्षांच्या पार्श्वभूमीरवर पोलिसांची पुण्यात करडी नजर आहेत. अवैध दारु विक्री आणि जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रीत केलं आहे. दरवर्षी पुण्यात गोव्यातून मोठ्या प्रमाणात दारु विक्रीसाठी आणली जाते. त्यांच्यावर कारवाई देखील केली जाते. 31 डिसेंबरच्या तयारीसाठी अनेक माफिया पूर्वतयारीत असतात. या काळात अवैध मद्य विक्री देखील जोरदार केली जाते. त्यांच्यासोबतच अमली पदार्थांची देखील मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. या टोळीवर दरवर्षी पोलिसांची नजर असते. दरवर्षी पुण्यातच नाही तर राज्यभरात मोठ्या प्रमाणात छापेमारी केली जाते.
अवैध प्रकरणांवर कारवाईचा बडगा
आजच 29 डिसेंबर सकाळी पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. 11 लाख रुपये किंमतींचं म्याव म्याव मेपेड्रिन जप्त केलं आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. त्यामुळे अंमली पदार्थांच्या तस्करीवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांचे विशेष पथकं तैनात करण्यात आली आहे. या प्रकरणी अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्याला अटक करण्यात आली आहे.