आळेफाटा :
पुणे शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील चाकण परिसरात घडली आहे. एका नामांकित उद्योजकाने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने एका 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आहे.
याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राजेंद्र दगडू गायकवाड या उद्योजकावर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी राजेंद्र गायकवाड हा घरी आला होता. त्यावेळी त्याने मुलीला फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने मुलीच्या आई-वडिलांना घरातून बाहेर पाठवले. मुलीचे आई-वडील बाहेर गेल्यानंतर आरोपीने ऑडिशन घेण्याच्या बहाण्याने मुलीला कपडे उतरवायला लावले. त्यानंतर आरोपीने मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केले. तसेच याबाबत कुणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपी तिथून पसार झाला.
या घटनेमुळे पीडित मुलगी घाबरली. मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला.मुलीवर अत्याचार झाल्याचे लक्षात येताच त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी गायकवाड विरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी आरोपी गायकवाड याच्याविरुद्ध पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.आरोपी फरार झाला असून आळेफाटा पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
